नमस्कार !
स्वा. सावरकरांच्या "सागरास" या कवितेला १०० वर्षे झाली. त्यांच्या काव्यकृतीला हे अनुवंदन..(विडंबन नव्हे. )
जीवनास
ने मजसी ने परतचि बालपणाला । जीवना, जीव कळवळला
मी मातेचा पदर धरुनिया तूतें । की प्रथम पाहिले होते
वदलास मला तारुण्य देशिं चल जाऊ । जगण्याचा ऊत्सव पाहू
वय अजाण हे भयशंकित जरी झाले । परी तुवा वचन मज दिधले
वाटेत तुला रंग नवे दावीन । स्वर्गिचि सफर घडवीन
विश्वसलो या तव वचनी । मी
नव अनुभव यावा म्हणुनी । मी
तव मधुर शब्द ते ऐकुनी । मी
मोहून स्वये त्वरित सोडले त्याला । जीवना, जीव कळवळला ॥१॥
शुक पंजरि वा हरिण शिरावा पाशीं । ही फसगत झाली तैशी
वय वाढ कशी सतत साहू मी येथे । प्रौढत्व वाढतची जाते
वय-कुसुमे मी वेचियली या भावें । की बाल्य सुगंधित व्हावे
जर त्या योगे विस्मर शैशत्वाचा । तर व्यर्थच भार वयाचा
ती बालसुलभवत्सलता । रे
वद गेली कोठे आता । रे
ही खंत वाटते चित्ता । रे
बघ स्वर्ग मला हाय पारखा झाला । जीवना, जीव कळवळला ॥२॥
जगी आश्चर्ये बहुत, मौज परी प्यारी । मज बालवयातिल सारी
हे खेळ नवे प्रौढ परी मज भारी । सानुली खेळणी प्यारी
त्यावीण नको राज्य प्रिय परी साचे । अंगणही बालपणाचे
भुलविणे व्यर्थ हे आता । रे
बहू जिवलग गमते चित्ता । रे
जी प्रिय तुजला शैशवता । रे
त्याचीच अता शपथ घालतो तुजला । जीवना, जीव कळवळला ॥३॥
पाहून मला हससी निर्दया कैसा । कां वचन भंगिसी ऐसा ?
मिरवीत असे तुझिया स्वामित्वाला । भिउनि कां सांग काळाला ?
की हतबल मी म्हणुनी असा फसवीसी । प्रौढत्व मला हे देशी
तरी नित्य-काळ-भयभीता । रे
हतबल न जाहलो पुरता । रे
अनसुयेस कथिन मी आता । रे
बघताच तिने जाइन शैशत्वाला । जीवना, जीव कळवळला ॥४॥
--- हेमंत राजाराम.