आम्ही आज जिवंत आहोत! खरंच आमचं दैव बलवत्तर ! ईश्वराचे आभार मानायला हवेत.
हे ईश्वर आमच्यावर अशीच कृपा दृष्टी असू दे ! आंम्ही फक्त दिनांक लक्षात ठेवू , आमच्यातले जे, ह्या जगाला पारखे झाले त्यांच्या स्मृती ठेवायला नकोत? . त्यांच्या मरणांवर अश्रू ढाळायला दिवस तर ध्यानात राहायला हवा ना! नित्य नैमित्तिक दर दोन सहा महिन्यांनी आपल्यातून संपून गेलेल्यांना सांगायला तो दिवस तर लक्षात ठेवायला हवा!
लोकल मधिल उडवली गेलेली स्फोटके, इस्ततः विखुरलेली माणसांची मढी आठवताय? आठवतेय तारीख , २६.११ आठवतेय?
आठवतेय ना? मग त्यांच्या चिरंतन स्मृती स्मरून स्वतः च्या मनाला विचारा , त्यांच्या मरणानंतर आंम्ही काय शिकलो? इस्ततः विखुरलेले हात , पाय, धड एकत्र करायला ? की त्यांच्या मरणावर नकाश्रू ढाळून स्वतःला समाजात प्रस्थापित करायला शिकलो.
किती लज्जास्पद बाब की गृह खात्याला स्फोट कसला नक्की गॅस की आणखीन कसला झाला हे स्फोट घडून गेल्यावरही सांगता येत नसेल तर हि आपल्या सर्वांची यशोगाथा संपूर्ण विश्वात झेंडा फडकवत असेल. अरे आज आपण जिवंत आहोत हालचाल होते म्हणून आपण जिवंत म्हणायचे ! पण ज्याच्या जाणीवा जिवंत असतात त्यांना जिवंत म्हणायचे की
टाचा घासत घासत जगणाऱ्यांना जिवंत म्हणायचे? होय आंम्ही जिवंत आहोत पण वैयक्तिक आखलेल्या एका सामाजिक कुंपणात. एका गोड निधर्मी वादाच्या अंगाई गीतांत. अजून किती रक्त रंजीत भूपाळ्या इतिहास गात राहील? आणि आपण जागे होऊ, समाजाच्या ह्या भिंती, ह्या जातीच्या भिंती , विषमतेच्या भिंती कधी जमीनदोस्त करून पुन्हा एकदा कधी एकमेकांच्या हातात विश्वासाने हात देऊन अखंडपणे उभे राहू!
मला तरी आशा वाटते की आपण पुन्हा उभे राहू! अगदी पाठीशी राज्यकर्त्यांचे सामर्थ्य नसले तरी आपण उभे राहू! एकमेकांना सावरत, एकमेकांना आधार देत आपण नक्कीच उभे राहू! आज ही माझी आशा आहे "सर्वे भवन्तू सुखिन:" हिच भावना प्रत्येक माणसात दिसेल!
आणि त्यावेळस हे जीवन मुक्त कंठाने हसेल ! नक्कीच हसेल आणि सार जग बघेल!
मी कोणाच्याही स्मृतीस वंदन करून माझ्या जाणीवा बोथट करणार नाही ,हूं! त्यांच्या चिता जरुर माझ्या मनात धगधगत्या ठेवेन !