करमणूक

काय बरोबर काय चूक हवी फक्त करमणूक

कसली तहान कसली भूक हवी फक्त करमणूक

आग ओका शस्त्रे रोखा हाणा मारा भांडत राहा

घुसमटणाऱ्या भावनांचा रोख बाजार मांडत राहा

कोण सच्चा कोण लुच्चा होऊन जाउद्या निवडणू़क

जळो कुणीही निवडून येवो तेव्हढीच आम्हाला करमणूक

रक्तं सांडा लाज सांडा पुरते झिंगा नीती सोडा

तेंव्हा होऊन करमणूक जीव जिवात येईल थोडा

युद्ध चळवळी दंगे मोर्चे अखंड चालो अमुक तमुक

घटकाभर नको, हवी आयुष्यभर करमणूक

कोणीतरी कोणालाही कशासाठी तरी झोडा

न्याय निराळे सर्वांसाठी अन्यायाला वाचा फोडा

मरेन म्हणा मारेन म्हणा करा पुरती अडवणूक

मरेल त्याचा जीव जाईल बघेल त्याची करमणूक

अफरातफरी बंडलबाजी घोटाळ्यांचे कळस करा

सहीसलामत सुटण्यासाठी 'भाव'भक्तिने नवस करा

गेंड्याच्या कातडिने बोला जिंदाबाद फसवणूक

फसो साधो तुमचा डाव होवो आमची करमणूक

गळी उतरवा गटारगंगा विका दरिद्रे मरण विका

नक्षत्रांचे अमिष दावुनी उडण्यासाठी पंख विका

तडे जाउद्या विश्वासाला भक्कम करा फसवणूक

लोक फसूदे फसू आम्हीही आमची त्यांची करमणूक

सामर्थ्य आहे करमणुकीचे।

जो जो करील तयाचे॥

- हृषीकेश कुलकर्णी.