प्रार्थना

हातात फुलांनी घ्यावा, ऐसा प्राण मला लाभावा,

गंधाने चुंबून घ्यावा, ऐसा परिमळ मी व्हावा.
मेघांनी मोहक नक्षी, माझ्या भाळी गोंदावी,
पाऊस माझिया अक्षी, ऐसा गगनघरोबा व्हावा.
लाटांनी समर्पित व्हावे, माझ्याच काळजांत,
यमुना, गंगा, भीमेचा, मी एक किनारा व्हावा.
साऱ्याच ॠतुंनी माझ्या देहातून गर्द भिनावे, 
मातीत माझिया प्रत्यही, हळवा अंकुर रुजावा.
त्या मोर, चकोरा साठी, नक्षत्र मृगाचे व्हावे,
चोचित तृषार्तांच्या ह्या, मज मोक्षही लाभावा.
पांथस्थ, पाखरांसाठी, मी सावली धरावी,
नित नवीन पालवी ज्याला, ऐसा ध्यान वृक्ष मी व्हावा.