भिजलेला पाऊस

भिजू नकोस म्हणून त्याला कुणी सांगावया न राहिले
काल पडत्या पावसात मी पावसाला पाहिले
भिजल्या पावसाला मी पुसता झालो काही
पाऊस म्हणाला भिजलो कारण मजला छत्री नाही
मी पावसाला खडसावलो 'तुला भिजण्याची काय हौस आहे?’
पाऊस म्हणाला चालायचचं पावसाळा दिवस आहे
भिजता भिजता पावसाच्या देहात हुडहुडी भरली
भिजणं अतीच झाल्यावर आडोशाला दडी मारली
अर्धओले कुणी तिथे आले कोण जाणे कसे झाले
शिव्या ऐकताना आडोशाला पावसाचे हसे झाले
चिंब भिजला पाऊस तिथून निघूनही गेला पण
होते तसेच कोरडे राहिले अखेर त्याचे मन