ह्यासोबत
सू.. सू करत वारा सोसाट्याने वाहू लागला. छपरावरचे पत्रेच काय? कौल हि हालायला लागली. बेफाम होऊन वारा सैरा वैरा ह्या अंगणातून त्या अंगणात नुसता मोकाट सुटला. सगळी कडे त्याचाच वावर होऊ लागला . संध्याकाळची दिवे लागण होऊन नसल्या सारखी झाली.माणसाला माणूस दिसेनासा झाला . आभाळ तर पार धुळीने माखलं. झाडांची पानेन पाने लव लवत आडवी तिडवी होत झाडे नाचायला लागली . सगळी कडे जणू निसर्ग धूळवड खेळून आनंद साजरा करू लागला . छपरांवरच्या झरोके बंद करण्यासाठी पोरा टोरांची धांदल उडाली होती.आभाळानी मध्येच रंग पालटायला सुरवात केली . धुळीने भक्क माखलेले आभाळ आता काळवंडायला लागल . पळून पळून दमल्यावर एखाद्या उनाड पोरासारखा वारा आता दमला . वाऱ्याच्या मांडवण्यामुळे, घरा घरातील दोन चार कंदील काहीसे फडफडत, प्रकाशाची साक्ष देत जगू लागले.फडफडणाऱ्या प्रकाशात काजळलेल आभाळ जास्तच काजळलेल दिसत असतांना , छपराच्या पत्र्याचा ताशा बडवत पावसाच्या पहिल्या सरीने मायेच्या ओढीने झेपावत धारिणीला आलिंगन दिल. थेंबन थेंब पोटच्या पोरासारखा पोटाशी घेत धरणी सुखावली होती.
"चला!, सुरवात चांगली झाली एकदाची!",म्हणत भायाने सुटकेचा श्वास सोडला. रोजच्या त्रासाने सगळा गाव मेटाकुटीला आला होता. डोक्यावर रण रणत ऊन झेलत नदीच्या किनारी कंबर भर खड्डा करून हाती काय?, तर घडा भर पाणी लागत होत. सगळ्या भागात जणू
पाण्यामुळे आग लागली होती. गावचा सरपंच राघो तात्या तर नावाचा सरपंच होता. गावात काही घडलं की सार गाव भायाच्या वाड्यासमोर जमायच शाळेला जमीन लागली ,दिली भायाने !, गाव देवीच्या जत्रेत स्वतःच्या खर्चाने सगळ्या गावाला जेवण भायाच घालत होता. एवढंच काय पुरुष पुरुष खोल खड्डे खणून भायाने गावाची तहान भागवण्याचा प्रयत्न केला होता. सगळा गाव त्याचा आणि तो गावाचा असा काहीसा प्रकार त्याचा होता.
बर ! आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच, पण बहाद्दर गावाच्या साठी आपल्या बारा एकरा पैकी चार एकर जमीन गावासाठी लागवड करुन सोडून देत होता. त्या चार एकर मध्ये जो काय दाणा गोटा यायचा त्यावर गावाचाच अधिकार, भले घरात काही नसल तर चालेल. अर्थात त्याच्यावर तशी वेळ काही देवाने आणली नव्हती .हे देवाचे आभारच म्हणायला हवे. त्यानी देवाचे आणि गावाने त्याचे , असा काहीस प्रकार होता.
अजूनही पत्र्याचा ततडम ताश्या वाजवत सगळा गावच काय जमेल तेवढी धरणीच जणू आपल्या कवेत घेत आनंदविभोर होत तो सगळ्या गावात नाचत सुटला होता.सलग दोन तास झाले तरी त्याला दम काही लागत नव्हता. रोज किर्र .. करत ओरडाणारे रात किडे कोणत्या बिळात लपून बसले कोण जाणे? , सगळ गाव कस शांत होत कुठेच काही चाळ नाही , फक्त एकच आवाज तड.. तड.
भायाला हि फेऱ्या मारून मारून कंटाळा येऊ लागला म्हणून आपला भला मोठा देह धप्पकन ओट्यावरच्या बंगईवर आदळत भाया विसावला होता. पायाने जमिनीवर रेटा देत बंगईवर भाया हिंदोळू लागला." काय होत माझ्या जवळ?" स्वतःशीच विचार करत भाया स्वतःभोवतीच एक एक आवर्तन पूर्णं करत भाया एकदम भूतकाळाच्या अंगणात जाऊन पोहचला.
काठोबाच्या परिसरात वाढलेला भाया बाप असून अनाथच म्हणून वाढला. घरची भरपूर शेती, पण लक्ष देणार कोणी हव ना! बाप होता तो बुवाच्या नादाला लागून अंगाला राख फासून देवाच्या शोधात निघून गेला , आणि आई म्हणावी तर तिचे हाड बापानेच गार केले होते.
कसल्यास आजाराच नाव झाल आणि ति दगावली. तिच क्रियाकर्म करून बोवा ने संसार त्यागला , तो कायमचा. तेव्हा पासून भाया वाढला तो लोकांच्या प्रेमावर कोणी वखराव, कोणी नांगरावर, कोणी पेरणी कोळपणीचा जिम्मा उचलावा, कोणी धान्य कापून व्यापाऱ्याला द्याव. बाप गेला तरी सगळा गाव वींना आई बापाच पोर म्हणून सांभाळ करत वाढवला. पोरग जाणत झाल्यावर हळू हळू गावाच्या मदतीने शेती करू लागला. धुडक्या धुडक्या म्हणत कालचा धुडक्या भाया कधी झाला स्वतः गावाला कधी कळल नाही . ज्या गावाने त्याला जगवलं, त्या गावाशी त्याने इमान राखल होत.कोणत्याही राजकारणात न पडता लोकांच म्हणून जगायच, म्हणूनच राघो तात्या म्हणत असतांना भायाने नकार देऊन त्यालाच पुढं पडायला लावल होत. बंगईच्या लई बरोबर भायाच विचार चक्रपण फिरत होत . थोडस बसून अवघडल्या सारख झाल्यामुळे
तिथेच बंगईवरच्या लोडाला सरळ करत भाया लवंडला . नेहमीच्या सवयीप्रमाणे भगवंताला नमस्कार केला आणि राम नाम घेत डोळे मिटून, तो शांत पडला.
क्रमश: