कदाचित दोष नसावा कवितांचा वा त्यातल्या शब्दांचाही,
कवितेची वळणं; तिथवर नजर पोचायच्या आधीच नाहिशी होतायत
आणि अर्थाचा गहिरेपणा उथळ झाल्यासारखा वाटतोय..
या शब्दांच्या भोवऱ्यात अडकलं की असं होतं का?
का जखम कोरडी होत आली की असं होतं?
का दोनही गोष्टीत हेच होतं?
...
शब्दांची गरज म्हणून भोवरा फिरत राहतो आठवांचा
आणि हेच धरून ठेवायचं म्हणून शब्द जुळत राहतात.
चक्रव्यूहासारखं झालंय;
तुला विसरावं तर शब्द हटून बसतात
शब्द सोडावेत तर मनातला नंदादीप अखंड तेवत असतोच...