हिसका

हिसका
''हा स्टिलचा टिफिनचा डबा कसा काय वाटतो ?'' अरविंद डबा हातात धरुन नाचवत म्हणाला.
''स्टिलचा ? वा ! आणखी दुसरा कसला नको कां ? अरे बाबा तुला परत परत सांगते
की ही मुंबई आहे. इथे माणसान 'पुढच्याला ठेच मागचा शहाणा'' असे वागल
पाहिजे. एवढ सांगुनही परत तुझ आपल तेच''. अरविंदची मावशी म्हणाली.
''अग पण ! आता एवढा ऑफिसर म्हणून जाणार आणि मग काय ऍल्युमिनियमचा टिफिनचा डबा नेऊ ?'' अरविंद त्रासिकपणे म्हणाला.
''हो हो तोच मी घेणार आहे. अरे हे बघ तु इथे नवीन आहेत. हे पहा , तो ऍल्युमिनियमचा डबा पाहु'' मावशी म्हणाली.
''अग पण -''
''हं कितिला ? ठीक आहे. द्या बांधुन'' अरविंदकडे लक्ष न देताच ति म्हणाली.
अशा तऱ्हेने खरेदीची सुरवात झाली. अरविंद दशपुत्रे. शिक्षण सर्व
कोल्हापुरला झालेल. सरकारी खात्यात नोकरी. तिथे असतांना डब्याची काळजी
नव्हती. दुपारी लंचटाईममध्ये घरीच येऊन मस्तपैकी आईने केलेल्या जेवणावर
ताव मारुन अर्धा तास डुलकी काढून मग कामावर परत जायची स्वारी. पण
ऑफीसर्सची परीक्षा पास झाल्यावर आता मुंबईच्या सरकारी खात्यात अधिकारी
म्हणून बदली झाली . त्यामुळे जेवणाचे जे सुख होते त्यास त्याला मुकावे
लागणार होते. पण इथे त्याची मावशी रहात होती. त्यामुळे तशी रहायची ,
जेवणाची काळजी नव्हती. मावशीचा डोंबिवलीला दोन खोल्यांचा ब्लॉक होता.
त्यामुळे सकाळी मस्तपैकी नास्ता करुन निघावे. दुपारी धरुन डबा आलेला
हाणावा व संध्याकाळी परत घरी अशी स्वप्न अरविंद रंगवत होता. पण सुरवातीलाच
मावशीने खो घातला होता. तिचे म्हणणे असे की इथे डबे चोरीला जातात. म्हणून
तिने स्टिलचा न घेता ऍल्युमिनियमचा डबा घेतला. वरुन मावशीची सतत टकळी चालु
होती,
" नीट वाग. वेंधळ्यासारख करु नकोस. ऑफीसर असलास तरी तो ऑफीसात, गाडीतून
येता-जाताना काळजी घे. पाकीट निट संभाळूंन ठेव. लोंबकळत जाऊ नको.
रस्त्याने चालतांना ह्या शहरात नवीनच आल्यासारखा इकडे-तिकडे बघत गावंढळपणा
दाखवत चालु नकोस. "
एक न दोन. हे सर्व एकल्यावर अरविंदाला विचार पडला की मुंबईला बदली झाली हे
एकल्यावर आपल्याला केवढा आनंद झाला. पण इथे येऊन आपली काही चुक तर झाली
नाही न ? ठीक आहे. उद्याच उद्या बघू म्हणत तो झोपी गेला.

आज कामाचा पहिलाच दिवस म्हणून मावशीने तुपातला गोडाचा शिरा काजू-बेदाणे
घालून केला होता. टिफीनच्या एका डब्यात शिरा, एकात पुऱ्या व तिसऱ्यात
बटाटयाची भाजी असा झकास बेत होता. अरविंद आपल्या कामावर रुजु झाला. पहिला
दिवस असल्याने प्रथम त्याने आपल्या सहकाऱ्यांशी ओळख करुन घेतली. तस इथल
वातावरण त्याला वेगळच वाटत होत पण एक प्रकारची उत्सुकता होती. आपल्या
कामाची प्रथम जुजबी माहिती करुन घेतली. तेवढयात लंच टाईम झाला. कामाच्या
गडबडीत वेळ कसा गेला कळलच नाही. काम बाजुला सारुन तो उठला व शिपायाला
लंचरुम कुठे आहे ते विचारले. मावशीने सकाळी निघतानाच सांगितले होते की
डब्यात काय काय आहे म्हणून त्यामुळे त्या आठवणीने व इतरांच्या डब्यातील
पदार्थांच्या वासाने त्याच्या तोंडाला पाणी सुटले . डब्यांच्या भाऊगर्दीत
तो आपला डबा शोधु लागला. कालच डबेवाल्याने जो नंबर सांगितला होता त्या
नंबराचा डबा व घरी दाखवलेली पिशवी तो शोधु लागला. कॅटिनमध्ये प्रत्येकजण
येई व आपला डबा उचलून खायला सुरवात करी. आज एखाद्या वेळेस अजून डबेवाला
आला नसेल असे समजूत थोडा वेळ वाट पहावी म्हणून तो जरा तिथेच उभा राहिला.
पण डबेवाल्याच काहीच चिन्ह दिसेना. आता मात्र त्याला कडाडुन भुक लागली.
रोजची आरामात जेवायची सवय पण इथे मला ..... ! आणि हा डबेवाला गेला कुठे ?
छे-छे .... तो डबेवाल्यावर मनात भडकत चालला.
''काय साहेब झाला का डबा खाऊन ?''
मागुन आवाज आला म्हणून अरविंदने मागे वळून पाहिले तर काल घरी आलेला डबेवाला.
''अरे खातो कसला ? माझा डबा कुठय ?'' अरविंद रागानेच म्हणाला.
''आं , म्हंजी काय ? आवो मी सोता डबा इथे ठेवला. वैनिसायबांनी पण मला
सांगितले की आज तुमचा कामाचा पहिलाच दिवस हाये . तवा सावकाश खायाला सांग
म्हून''. डबेवाला आश्चर्याने म्हणाला.
''म्हणजे मग इथन डबा गेला कुठे ?'' आता अरविंद अर्धमेला झाला होता.
''अवो आता मी काय सांगु सायेब ! हां , हिथ डब्यांच्या लई चोऱ्या हुतात बघा''. डबेवाला म्हणाला.
अरविंद दशपुत्रे मनात एकदमच भडकला. आता ह्या डबेवाल्याला काय बोलणार? आज
पहिलाच दिवस आणि .... तो पटकन आपल्या केबिनमध्ये परत आला व शिपायाकडून
हॉटेलातले थोडे खायला मागवले.
''साहेब'' - डबेवाला केविनचे दार उघडून आत येत म्हणाला.'' ''साहेब रागावू
नगा. पण मी तरी काय करु. मी रोज इथे डबे आणून ठिवतो व समोरच्या दुसऱ्या
हॉफिसात जाऊन तिथले डबे घिऊन येतो. आता तुमचा डबा गेला त्याला ....."
''जाउदेरे "
''उद्यापासून अस करतो साहेब, हॉफसर लोगांची जेवायची वेगळी जागा आहे.
तिकडेच तुमचा डबा ठिवतो. म्हणजे चोरी व्हायचा चान्सच नाई''. डबेवाला
त्याला उपाय सुचवत म्हणाला.
''ठिक अहे, तसच करु . म्हणजे आता दुसरा डबा विकत घ्यावा लागणार. तरी बर स्टिलचा आणला नाही तो'',
''कशाला विकत आन्ता सायब, उद्या सकाळी मी येतांना वैनीसायबांकडे नवीन डबा दिन आणि लगेच भरुन घीन''. उबेवाला म्हणाला.
''चालेल, आता दुसर तरी मी काय करु. बर तुझ नांव काय म्हणालास ?"
''पांडुरंग सायेब'',
''म्हणजे तुझ्याकडे नविन डबेही असतात काय ?''
''हां साहेब . ठिवतो थोडे थोडे. बार , निधू म्यां ? रागावू नका'',
''छे छे , निघ तु''

''बघ मी सांगत होते न तुला ? तुला वाटल असेल की मावशी अस काय बोलते
म्हणून पण शेवटी तेच खर झाल नां ? आणि म्हणे स्टिलचा डबा हवा. तरी बर आणला
असता तर भिक नको पण कुत्रा आवर अशी पाळी आली असती''. मावशी फणकाऱ्याने
म्हणाली.
''अग पण मला काय एवढी कल्पना ? आणि तो डबेवालाही चांगला वाटतो. तो चोरेल अस वाटत नाही''.
''हे बघ इथे अशीच लोक असतात. ज्यांचि शंकाही येत नाही तेच चोर असतात. तु आपला निट वाग बाबा. नाहीतर दुसरा डबेवाला बघू''.
''कोणी चोरला त्याची बेटयाची मजा झाली. साजुक तुपातला शिरापुरी. हं ''अरविंदने सुस्कारा सोडला.
''अरे हा तर मुंबईतला पहिला अनुभव आहे. म्हणून म्हणते नीट वाग''.
रात्रि झोपतांना अरविंद विचार करु लागला. पहिली मुंबईची सलामी तर घडली
होती. आता पुढे काय होते ते बघायचे. मावशी म्हणते तेच खर. इथे गावंढळपणे
वागून चालणार नाही. विचार करता करता तो झोपी गेला.

आज कामाचा दुसरा दिवस होता. अरविंद ने आल्य आल्या फायलींचे गठ्ठे
हातावेगळे केले. नवीन स्टेटमेंट बनवायची होती ती कारकुनांना बनवण्यास
सांगितली. कुठलही काम पेंडींग ठेवण त्याला आवडत नसे. त्यामुळे कामात गढुन
गेल्यावर वेळ कसा गेला तेच कळल नाही. लंच टाईम झाला. कालची थोडी धास्ती
होतीच. त्यामुळे आज थोडा वेळ आधीच तो उठला. डबेवाला आधी येऊन त्याच्या
केबिनमध्ये येऊन सांगून गेला होता की आज त्याने डबा ऑफिसरांच्या
कॅटिनमध्ये ठेवला आहे. त्यामुळे कुठे जाण्याची भिती नव्हती. तरिही तो
उठला. हात धुतले. रुमालाने हात पुसत पुसत तो ऑफिसर्स कॅटिनमध्ये गेला व
डबा शोधू लागला. पण त्याचा नंबर असलेला डबा त्याला कुठेच दिसेना. त्याला
थोडी धडकीच भरली. पण परत परत तो डबे शोधू लागला आता तो मनात भडकला. काल ही
तेच आजही तेच. हा कोण चोर सोकावलाय ? एवढयात पांडुरंग आला.
''काय साहेब ? मिळाला कां डबां ?''
''आजही दिसत नाही, इथे काय चोरांचा सुळसुळाट आहे की काय ? डबे जातात कुठे ?'' तो जरा मोठयानेच बोलला.
''आं .... काय म्हन्ता काय ? आवो मी सोता डबा इथे ठेवला आणि मग समोरच्या
ऑफीसात गेलो. तिथले डबे घेऊन हिथ धावत आलो. म्हन्ल काल झाल तस आज होऊ नये
म्हून''.
''काय झाल काय ?'' त्याच्या शेजारच्या केबीनमध्ये बसणारे दुसरे अधिकारी
तिथे येत म्हणले. तेव्हा अरविंदने त्यांना सगळी हकीकत सांगितली.
''हो, अस इथे कधी तरी होत खर. पण अहो कंप्लेंट करुनही काहि उपयोग होत
नाही. इथे आत्तापर्यंत असे काही डबे गेले आहेत. पण चोर काही सापडत नाही.
म्हणून आम्ही हल्ली केबीनमध्येच डबा ठेवतो व तिथेच खातो. इथे येवढे डबे
येतात पण काही पत्ता लागत नाही. मधे मधे पुष्कळ जणांचे गेले होते.
त्यानंतर आजच तुमचा गेल्याचे एकतोय . माझही अत्ताच लंच झाले. नाहीतर मी
तुम्हाला बोलावल असत लंचला. "
''जाऊ द्या हो साहेब ... पण ....''
''आता काय सांगायच साहेब ? मधी काही दिवसापूर्वी अस व्हायच. पण सर्व लोग
आमच्यावरच नांव घ्यायला लागले. आम्हीच डबे चोरले असं म्हनाया लागले. पण
साहेब आता हाच आमचा धंदा. आता ह्यातच खोट करुन कस चालेल. हां , एकदा
येकाला पकडल होत, आणि तो बघा शिक्षा भोगून सुटला हाये असं एकल होत''.
''तुला आता काय बोलाव तेच कळत नाही. आता आजही बाहेरच खाव लागणार'' अरविंद म्हणाला.
''दशपुत्रे साहेब तुम्ही असच करा'' - बाकीचे काही ऑफीसर्स त्याच्या भोवती
नमले होते त्यातला एक जण म्हणाला. डबा आपल्या केबीनमध्येचघ्या. म्हणजे
चोरी व्हायचा प्रश्नच नाही''.
''बरं , हे बघ पांडुरंग उद्या डबा माझ्या केबीनमध्ये ठेव. आणि नवीन टिफीन मी आज आणिन. तुझा नको आणूस'' अरविंद म्हणाला.
''ठिक आहे साहेब'' डबेवाला म्हणला व गेला.
''एकदा असच झालं - असे म्हणून साहेबांच्या कोंडाळ्यात गप्पा सुरु झाल्या.
अरविंद त्यांच्याशी थोडा वेळ बोलून मग केबीनमध्ये आला व शिपायाला
हॉटेलातूनच खायला आणायला सांगितले.

''बघ इजा बिजा आणि आता तिजा व्हायला नको म्हणजे झाल. तोंडावरन तर हा चांगला दिसतो. असे काही करेल अस वाटत नाही. पण -''
''अग मावशी तो तसा नाही गं. दुसराच कोणीतरी असेल''
''ए ... हे, तुला तर सगळे हरिश्चंद्राचेच अवतार दिसतात. नांव पांडुरंग असल
तरी याचा रंग वेगळाच दिसतोय. उद्या येऊ दे त्याला म्हणजे खडसावतेच चांगला.
कसा पगार मागतो बघते मी''. मावशी रागातच म्हणाली.
''अग जाऊ दे ग, तो तसा नाही दिसत. अग त्याने सांगितल सुध्दा " असे म्हणून अरविंदने घडलेली हकीकत परत मावशीला सांगितली.
''तु काहीही म्हण, पण बघ मी सांगतेय तेच खर होतय नं , जपुन वाग. आज डब्यात
पोळी आणि थोड श्रीखंड घातल होत. म्हटल आज तरी ''पहिल्या दिवसाचा डबा''
म्हणून जेवेल, तर जळ्ळ मेल लक्षण. कोण तो चोर सोकावलाय. ''मावशी त्याच्या
नांवाने बोटे मोडत म्हणाली. ''
''आजच येतांना तरी मी नविन टिफिन आणलाय. घेतांना देवाच नांव घेतलय. म्हटल हा तरी जायला नको'' अरविंद म्हणाला.

आज ऑफिसातला तिसरा दिवस. आज अरविंदच कामात लक्षच लागत नव्हत. थोडयाच
वेळापूर्वी पांडुरंग डबा त्याच्याच केबीनमध्ये ठेउन गेला होता. दर पाच पाच
मिनिटांनी तो डबा जागेवर आहे नं अशी खात्री करुन घेत होता. लंच टाईम होत
आला होता. कामाच्या फाईल्स बाजुला सारुन आता जेऊन घ्यावे असा विचार करत
होता इतक्यात केबिनचे दार थोडे किलकिले झाले. आता ह्यावेळी कोण आल म्हणून
त्रासिकपणेच अरविंदने विचारले -
''कोण आहे ?''
''साहेब डबा खाउन झाला काय ?'' आत येत एका माणसाने विचारले.
''आं , अरे अजुन व्हायचय आणि तु कोण ?''
''मी, माझं नांव तुकाराम साहेब''
''मग पांडुरंग कुठे आहे ?''
''पांडुरंग तो समोरच्या हॉफिसात डबे आणालया गेला आहे. तो मला म्हनला की तु
सोता जाऊन सायबांचा डबा घेउन ये. दोन दिस त्यांना बरोबर जेवायला मिळाल
नाही. आणि आज पांडुरंगला जरा लौकर घरी जायाच आहे. घरी त्याच्या नातवाचे
बारस आहे म्हून''.
''बर-बर-अरे आज तरी मला निट खाऊ दे. दोन दिवस तर त्या चोरामुळे धड जेवणही निट मिळाले नाही'' अरविंद म्हणाला
''चोर ? म्हणजे सायेब तुमचा बी डबा चोरिला गेला होता की काय ? अरा रा....रा''.
''... तर काय ? दोन दिवस माझे डबे चोरीला गेले. अशा काही शिव्या चोराने खाल्यात -''.
''पण काय उपयोग साहेब ? चोर शिव्या खाण्याआधी तुमचा डबा खात असेल. मग भरल्यापोटी शिव्या काय खाणार तो ?''
''पण ह्या चोराला दुसऱ्याला भुकेल ठेऊन काय मिळत कुणास ठाऊक ?'' अरविंद हात धुउन येत रुमालाला पुसत म्हणाला.
''अहो भुकेल्या पोटी कुणाला निति सुचते सायेब ? डब्यातला खात असेल -
म्हंजे येकटायमाचा जेवणाचा प्रश्न सुटला. बाजारात तोच डबा पाच-दहा रुपयाला
इकून टाकत आसल. म्हणजे इडिकाडीचा प्रश्न सुटला. बरे ते जावू दे. तुमी
लागलीच डबा खावून द्या बघु, मी जाऊन आलोच''.
असे म्हणुन तुकाराम निघुन गेला. अरविंदने झटकन टिफीन पुढे ओढला व टेबलावर
डबे उघडून ठेवले. दोन दिवस हॉटेलातच त्याला चिवडाव लागल होत. आज मावशीने
पोळी बरोबर दहीसाखर - म्हणजे श्रीखंडाचा बेत दहिसाखरेवर आला होता तर -
आपल्या आवडीची कांद्याची भाजी भात व आमटी.... अगदी भराभर अरविंदने जेवायला
सुरवात केली. आज त्याने मनसोक्त जेऊन घेतले व अं .... ब..... करुन ढेकर
दिली.
''झाला का सायेब डबा ? द्या लौकर',खाली पांडुरंग उभा आहे''.तुकाराम आत येत म्हणाला.
''अस काय ? बर हा घे डबा. आज छान जेवण झाल'' अरविंद म्हणाला.
''बर साहेब निघतो मी'', म्हणून तुकाराम निघून गेला.
बाहेरुन बेसीनमध्ये हात धुवुन येऊन रुमालाला पुसत पुसत अरविंद केबिनमध्ये
आला. आज कसे पोट भरल्यासारखे वाटत होते. हळुवारपणे खुर्चीत बसत तो विचार
करु लागला. बाकी मावशीच्या स्वंयपाकाबद्दल प्रश्नच नाही. पण आज चोराने
विश्रांती घेतलेली दिसतेय. दोन दिवस बेटयाची मजा झाली पण आता डबा जाण्याचा
प्रश्नच नाही.
''साहेब येऊ का आत ?'' पांडुरंग आत येत म्हणाला. ''झाला का डबा खाऊन ?''
''आ म्हणजे ! अरे तुझा मित्र तुकाराम येऊन डबा घेऊन गेला की.
''तुकाराम, अहो मी इथे एकटाच डबेवाला आहे''
''मग मगाशी डबा घेऊन गेला तो कोण ?''कपाळावर हात मारत अरविंद म्हणाला.
पांडुरंग त्याच्याकडे डोळे मोठे करुन व तोंडाचा चंबु करुन पहातच राहिला.
आता पुन्हा म्हणुन डबेवाल्याकडून डबा न मागविण्याचा त्याने मनाशी निश्चय केला.