ना नको आता मज रम्य मनोहर बाग
अन ते तसले हिरवे सुंदर नि पराग
अन नकोच चंद्राचे प्रेमळसे गाणे
या वाळवंटि प्यारे मज हेच रहाणे..
या मरुस्थलातिल अशी फकीरी न्यारी
खापर ही न मिळे कुठून मिळे जल-झारी
सुटले ओझे जगताचे; बंधन तुटले;
मृगजल-आशेची ओढ क्षणिक जरी प्यारी
स्वच्छंद भटकतो जरी रापते कांती
कांती ही न उरे अंती; केवळ भ्रांती
हुंदडण्याचिच उरली मज अन्य न आस
अश्वत्थाम्यापरी शाप न उरी, मनशांती
जखमेस लेपण्या तेलाची अन वाटी,
माळेतिल रत्ने झाकी दांभिक छाटी
हि रत्ने मज दक्षिणा दिली ओरडतो,
दात्याच्या तनुभस्माची अंगी पट्टी...
तर निदान अपुली नाही तैसी रीत
संयमनाच्या वरदाने खुलते प्रीत;
येतील वादळे दांभिक घोंघवणारी
निश्चलतेतूनच प्रतीत होई जीत ...
--- हेमन्त