नशेत होतो मी !

तुम्ही बोलता, नशेत होतो मी !
खरेच सांगू..?..मजेत होतो मी !

कुणीच नव्हता प्रकाश देणारा?
कश्या दिव्यांच्या सभेत होतो मी?

कुणीही यावे, घरास फोडावे!
कधीच नाही!.. सचेत होतो मी!

नको रागवू, उगा अशी, संध्ये!
कधी उषेच्या प्रभेत होतो मी...?!

काय सांगता?...किती दिल्या हाका !
अहो,.. सखीच्या कवेत होतो मी !

वजाच केले, व्यथे, मला तू ही?!
कधी तुझ्याही जमेत होतो मी..?

दिसेल का रे, नभा, तुला शेंडा?
तुला वाटले, धरेत होतो मी!

"म्हणून तुजला वरून आदळले",
हवा म्हणाली," हवेत होतो मी "

सुधारणांचा झुगारला काढा!
किती रुढींच्या नशेत होतो मी!

कधीच नायक तिच्यातला नव्हतो;
...हरेक पानी, कथेत होतो मी!

कशास देता, अता मला अग्नी?
सबंध जीवन चितेत होतो मी!

                    -मानस६