सही

चांदण्यात न्हालेलं ते रंगमंदिर आणि तो पूर्ण चंद्र
अत्तराचा सुवास फुलांचे रंग नि सनईचे सूर मंद्र
शिफॉन साड्या मलमली कुर्ते अभिजनांची गर्दी
तिला पाहायला आलेले प्रेक्षक चाहते आणि दर्दी

कोपऱ्यात तो उभा गुलाबांतल्या निवडुंगासारखा
दखल घ्यायला अपात्र नि एका नजरेसही पारखा
हातात एक पत्र अन प्रतीक्षा त्या स्वप्नसुंदरीची
जरी स्थिर उभा तरी उघड व्याकुळता अंतरीची

स्मरतील का तिला दिवस मुग्ध किशोरवयातले
तासनतास गप्पा ती गाणी ते क्षण पावसातले
जरी आज ती श्रीमती अन विख्यात अभिनेत्री
जपली असेल का तिने ती बालपणीची मैत्री

'आल्या आल्या'चा गलका अन चाहत्यांचा गराडा
धावला तोही ओढीने आणि घुसला तोडून वेढा
उभा क्षणभर तिच्यापुढे नजरेस नजर भेटली
हसला तो डोळ्यांत तिच्या ओळख ना उमटली

सरकला घोळका पुढे पण तो उभा तसाच खिळून
भंगलेले हृदय छातीत अन स्वप्ने गेलेली जळून
सूर सनईचे छळती आता चांदणे अंग अंग दाही
हातात ते पत्र तसेच आणि त्यावर.. तिची सही