ती...

ती...

सारे हंगाम सोंगून काढताना तिच्या तळहाताचे खडक झाले
रानोमाळ विखुरलेलं पोट गोळा करताना
तळपायाना फुटले लाल झरे
तिच्या गळ्यातल्या काळ्या पोतीत कधी थांबला नाही पिवळा मणी
पदरानं गळा झाकत पाहुण्या राहुळ्यात वावरली
अन इतक्या सहज मिसळली त्यांच्या हसण्यात
जसं पाणी पाण्यात

आपल्या आयुश्याचं खारेपण तिने ओघळू दिलं नाही
कधीच कुणाच्या गोडव्यावर
फक्तं अंधारालाच फुटायचे कधी हुंदके

तिच्या अंगणातली रांगोली रंगांशिवाय राहिली
पण तुळस ठेवली हिरवीगार 
अन कुंकू तेवढं ठसठशीत

मिणमिणतच गेल्या तिच्या कितीतरी दिवाळ्या
ओवीतच राहिलं ओवीतलं माहेर
अन सुन्या सार्या भाऊबिजी
ती स्वतःलाच बांधत आली राखी
भर उन्हात सावली धरली घरावर वडाच्या झाडासारखी

असे कितीतरी रुतू तिने वाहिलेत आपल्या डोक्यावर
ताठ कण्याने चालली ओझ्याने कधी वाकली नाही
लोक सागंतात गावातले की इतक्या मळातून गेली
पण जरासुद्धा मळली नाही...

वैभव देशमुख