१
ठसे वाटेत बैलांच्या खुराचे
दिसे डबक्यातले पाणी चहाचे
उठे पाण्यावरी गोरे तरंग
कुणाचे घासले पाण्यास अंग
२
हवेचा येइ हिरवागार झोका
झुले त्याच्यासवे डोंगरही अख्खा
कसे हे साठवू सौंदर्य डोळी
बहरल्या डोंगरावर रानकेळी
३
धुक्याचा सारला परदा हवेने
उभे डोळ्यात हिरवेगार लेणे
कळेना काय डोळ्यांनी टिपावे
कळेना ओठ कोठे टेकवावे
४
निळा अंधार होता दाटलेला
पिकांचा वास ओल्याशा हवेला
कमी ना भासली कुठल्या दिव्याची
अशी झगमग बघितली काजव्यांची...
- वैभव देशमुख