अर्पण

अर्पण

माझ्याकडे जर सुख असते
तर असे काहीतरी केले असते
की तुझ्या डोळ्यातून पडणारा प्रत्येक थेंब
हातात हिरा बनून पडला असता
दु:ख झाले नसते असे नाही पण
मग देवही आपल्याबरोबर रडला असता

माझ्याकडे जर तारे असते
तर असे काहीतरी केले असते
की प्रत्येक अंधळा तारा जगातला
तुझ्या स्पर्शाने प्रकाशीत झाला असता
आणि रात्री तू फुंकर मारल्यावर
सगळे तुझ्याबरोबर झोपले असते

पण माझ्याकडे हे काही नाही
फक्त माझे शब्द आणि स्वप्न आहेत
तेही मी तुझ्या जीवनाच्या वाटेवर
गालिच्यासारखे पसरले आहेत
जरा जपून पाय ठेव कारण
तू माझ्या स्वप्नांवर चालती आहेस
कागद चुरगळल्याचं दु:ख नाही
स्वप्न तुटायचा आवाज नाही
पण टोचणारे शब्द आणि स्वप्नांचे तुकडे
तुझ्या पायात रूतायची काळजी वाटते
आणि मला सापडलेला मी परत
तुझ्या नकळत हरवायची काळजी वाटते

-- मयुरेश कुलकर्णी