फडफडतो काळजात माझ्या या प्रश्नाचा कागद
स्वच्छ कुण्या रबराने होइल आयुष्याचा कागद
अदभुत गोष्टींनी भरलेले आजोबांचे पुस्तक...
ताऱ्यांची कविता लिहिलेला अंधाराचा कागद...
किती किती होकार घेउनी वेळा आल्या, गेल्या
हाय! अपूरा पडला माझ्या तळहाताचा कागद
अक्षर अक्षर तिचे तेवते दिवा बनून वाटेवर
तिच्या जवळ नव्हता कुठलाही ती शिकल्याचा कागद
शहर नवे होते कोणाची ओळख पाळख नव्हती
'नाही' 'नाही'ने भरला माझ्या दिवसाचा कागद
तुला पुरेना सागरशाई माझ्या निंदेसाठी
तुझ्या स्तुतीला मला पुरेना आकाशाचा कागद
अखेर पुसता आली नाही ती चुकलेली नावे
होती दगडाचीच लेखणी अन दगडाचा कागद
- वैभव देशमुख