दुवा क्र. १
स्वतःत गुरफटून जाऊन
कुठलंसं गाणं मनोभावे म्हणत
मी चाललो होतो फुटपाथवरून
गुणगुणत गुणगुणत......
कडेलाच बसलेला ज्योतिषी
जाता जाता भेटला
अचूक भविष्य सांगतो आम्ही
म्हणत काकुलतीने उठला
मी नकोच म्हणत होतो
पण त्याने केला भाव
बोलला तसे एक्कावन घेतो
पण अकरा चालतील राव
भविष्याची कीव आली
अन मनात हसलो
हो नाही म्हणत अखेर
त्याच्या पोत्यावर बसलो
त्याने हात हातात घेतला
भिंगातून पहिल्या रेषा
कपाळावर आट्या पाडत
चालवली मंतरलेली भाषा
माझी मान डोलताना
त्याचा उत्साह दुणावला
मी बनत गेलो
त्याने जितका बनवला
त्याचा पाढा संपताच
हसत पैसे देऊ केले
त्याच्या बनेल चेहऱ्यावर
एक प्रश्नचिन्ह उमटून गेले
मी त्याला म्हणालो.....
'माहित नाही किती तथ्य
महाराज तुमच्या शब्दात आहे
मात्र आज पुन्हा कळलं कि,
माझे भविष्य हे,माझ्याच हातात आहे!'
- संतोष खवळे