अथांग

स्वतःबाहेर निघून एकदा स्वतःकडे पहावं वाटतं
मी-पण सोडून मला थोडं अथांग व्हावं वाटतं
कुठून आलो? का आलो? कुठे जायचे? 
जाण्याआधी इथून हे कोडं सोडवावं वाटतं
हे बरोबर ते चुकीचे, सारे सारून मापदंड 
कधी पावसात कधी उन्हात बिनधास्त नहावं वाटतं
वाटा सगळ्या जाऊन तिथे होतात दिसेनाशा 
क्षितीजानंतरच्या वाटेवर मज साक्षी राहवं वाटतं
आजवर नित्य पिचला चाकोरीत जो इथे 
आतल्या बंद 'मी'ला आता मोकळेपण द्यावं वाटतं