घडी

कधी व्रत लेउनी होतीस तू अन्‌

कधी मी सोवळे नेसून होतो

असे वर्षानुवर्षे नीट आपण

दुराव्याची घडी बसवून होतो

तुझ्या-माझ्या सुखी सहजीवनाची

जगाने पाहिली रेखीव चित्रे

अशा रेखाकृतींनी चित्रदालन

घराला आपल्या बनवून होतो

'इथे शीतल झरा वाहे सुखाचा,

इथे अपुलेपणाची ऊब आहे'

अशा ह्या पुस्तकी प्रतिमांत आपण

कधी उबलो, कधी गोठून होतो

ठराया लागले आहेत अपुले

अताशा वादही कंटाळवाणे

नव्याने काय कुरघोडी करावी,

जुने मुद्दे पुन्हा उकरून होतो

कुणीही येत नाही, जात नाही

मनाच्या उंबर्‍याला पार करुनी

दुतर्फा चेहर्‍यावर स्वागताच्या

कनाती रेशमी उभवून होतो ...