कवीच्या आत कधी उतरतांना
सहजच दिसेल तुम्हाला आत
ऊन सावलीचा होणारा खेळ
तो मात्र शांत, हे सार बघतांना
धुक्याच्या अवजड भिंती
आपल्या कल्पकतेने तोडून
थेट प्रकाशाकडे झेपावत
दिसेलच तो संवाद साधतांना
मानवी आरश्या समोर राहून उभं
नित्याचंच ते मंद मंद हसणं
दिवा प्रकाशाच्या भित्तीछाया
दिसेल कदाचित त्यांच्याशी बोलतांना
कोणाच्या मुद्द्यांशी लोळण घेत
विचारांच्या पुंजक्यांशी भाडतांना
सळसळणारे जीवनं धमन्यांतून वाहत
दिसेल नावीन्याचा प्रवास करतांना