सर्वत्र गर्दी माणसांनी भरलेली
मधमाश्याच्या पोळ्यासारखी लोंबत आयुष्याला
सुखाच्या शोधात गोड स्वप्नात हरवून
गर्दी गोंधळात वाट काढीत
काहीतरी ,कसेतरी पुढे जाण्याच्या प्रयत्नात
सगळीकडे सर्वत्र आशेचे सूर
ह्या महानगराच्या नाड्या दूरवर जोडल्या गेल्यात उपनगराला
ह्या महानगराचे हृदय शाबूत राहावे म्हणून
उपनगराच्या शिरा जोडल्यात
बायपास करून महानगराच्या हृदयाला
आता वीस वर्ष धोका नाही
ईतक्या लवकर हे महानगर मरणार नाही
पुढारी छातीठोकपणे सांगतात
पैसा खेळू लागलाय सर्वत्र
प्रत्येकाच्या खिशात
मध्यमवर्ग बघू लागलाय स्वप्न निनो गाडीचे
आयटी. . झालाय पोरगा
आठ ,दहा लाखाचे प्याकेज
नि सुबत्ता खेळू लागलीय घरात
कारकून बापाचे स्वप्न फुलू लागलेय
त्याचे डोके तरंगतेय हवेत
मुलाच्या स्वप्नावर स्वार होऊन तो बांधतोय
ईमल्यावर ईमले
काय होणार कुणास ठाऊक ह्या पृथ्वीचे
प्रचंड लोकसंख्या फुसांडत गिळून घेतेय भूभाग
कीड लागलीय ह्या पृथ्वीच्या फळाला
तरी प्रत्येकाच्या घरात एकुलते एक पोर [फक्त ]
ह्या प्रचंड जमावात कोणीच आपले उरणार नाही
एक अश्रू गाळायला ....!!
सर्वत्र गर्दी माणसांनी भरलेली
मधमाश्याच्या पोळ्यासारखी लोंबत आयुष्याला
सुखाच्या शोधात गोड स्वप्नात हरवून ......!!