असे कुणीतरी यावे.....

असे कुणीतरी यावे,
जिच्यात आपण हरवूनी जावे ।
शोधिता अपुल्यास अपुल्यात अपुल्याला,
तिचेच दर्शन व्हावे ।
हे असे कुणीतरी यावे.....

ओठांतले ते शब्द तिने मग,
अलगद झेलुनी घ्यावे ।
अबोल अश्या ह्या डोळ्यांतले ते,
भाव समजोनी जावे ।
हे असे कुणीतरी यावे.....


मौन धरिले तिनेच जरका,
मी अस्वस्थ असावे ।
अश्या क्षणिमग बोलुनी काही,
मौन तिने सोडावे ।
हे असे कुणीतरी यावे.....

बोल लाविले तिला कुणी तर,
घाव मलाच मिळावे ।
घाव लागता अंगी माझ्या,
आईग... असे तिने म्हणावे ।
हे असे कुणीतरी यावे.....

वाद जाहले अमूच्यात तरी मग,
मीच मला रोखावे ।
माझी असो वा तिची चूक ति,
मीच " सॉरी " म्हणावे ।
हे असे कुणीतरी यावे.....


हरलो जरी मी भांडणात तिच्याशी,
तिने हसत जिंकावे ।
हसू पाहता तिचे असे ते,
मी नेहमीच हरावे ।
हे असे कुणीतरी यावे.....

हे असेच कुणीतरी आले तर मग,
स्वप्न कशास म्हणावे ।
स्वप्न उतरिले सत्यातच जरका,
सत्य ते फसवे नसावे......।
हे असे कुणीतरी यावे.....


हर्षद अ प्रभुदेसाई.....