गोष्ट बाबुरावची --- १

         "माझ नाव बाबुराव " तो माझ्याशेजारी बसत म्हणाला.कॉलेज नुकतेच सुरू झाले होते त्यामुळे लेक्चर्स अजून सुरू झालीच नव्हती.अर्थात लेक्चर्स सुरू होणे आमच्यापेक्षा मुलांच्याच म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनावर अवलंबून होत.तोपर्यंत पुढील वर्षाच्या नव्या अभ्यासक्रमाची तयारी करावी म्हणून माझ्या विषयाचे पुस्तक चाळत होतो त्यामुळे बाबूरावकडे दुर्लक्ष करायचे कारण नव्हते आणि तो अगदी दुर्लक्षणीय प्राणी नव्ह्ता.चांगला सहा फूट उंच,अंगानही तसाच भरलेला,वर्णान काळा म्हणता येणार नाही पण लक्ख गोराही नाही असा. चांगल्याच भारी कापडाचा शर्ट व पॅंट त्याच्या अंगावर होता.आम्ही सगळे नुकतेच पगार मिळवू लागल्यामुळे कपड्यासाठी बेतास बातच खर्च करणारे त्यामानाने त्याचे कपडे आमच्या त्या वेळच्या परिस्थितीस न शोभणारे दिसत होते.त्यामुळे त्याच्या पुढील वाक्याने मी सर्द झालो

"मी आजच लेक्चररच्या पोस्टवर जॉइन झालोय"

असला तगडा आणि भारी पोषाकातला माणूस लेक्चरर म्हणून बरा वाटत नव्ह्ता कदाचित सैन्यात मेजर वगैरे म्हटला असता तर जरा बरे वाटले असते अर्थात माझ्या वाटण्याशी त्याला काही देणेघेणे नव्हते.मी जरा खुर्चीवरील बूड उचलत त्याचा हात हातात घेत म्हणालो,

" वेलकम बाबूराव--- " त्याचे आडनाव जाणून घेण्याची माझी इच्छा ओळखून त्याने माझे वाक्य पुरे केले

" बंगाळे "

तेवढ्यात आमचे आणखीही प्राध्यापक दोस्त तेथे आले आणि बाबूरावने आपली ओळख करून देत सर्वांना चहा पिण्यासाठी निमंत्रित केले.पहिल्या दिवशी तरी बाबूरावने आमच्यावर चांगली छाप पाडली.

          बाबूराव नंतर माझ्याशेजारच्याच टेबलवर बसू लागला आणि त्यामुळे त्याचा आणि माझा संबंध जरा जास्त जवळचा झाला. तसे औरंगाबाद त्यावेळी फार मोठे नव्हते आणि सगळेच आमच्यासारखे मराठवाड्याच्या बाहेरून आलेले त्यामुळे दोस्ती जमायला वेळ लागला नाही. बाबुराव कामावर रुजू झाल्यावर मात्र त्याचा पोषाक बदलू लागला आणि हळू हळू तो पक्का मराठवाड्यातला भासू लागला.तसा तो होता मराठवाड्यातलाच पण शिक्षणासाठी हैद्राबादला राहिलेला.औरंगाबाद पूर्वी निजाम स्टेटमध्ये येत असल्याने व त्यावेळी औरंगाबादला इंजि कॉलेज नसल्यामुळे मराठवाड्यातील काही विद्यार्थी हैद्राबाद्च्या उस्मानिया  युनिव्हर्सिटीच्या इंजि.कॉलेजात प्रवेश घेत त्यापैकी तो एक  !   

                माझ्या शेजारी बसून गप्पा मारताना बंगाळे उस्मानिया विद्यापीठातील निरनिराळ्या प्राध्यापकांच्या गमती सांगायचा.बहुतेक त्या विद्यापीठात त्यावेळी प्राध्यापकांना शिकवणे म्हणजे वेळ वाया घालवणे असे वाटत असावे असे त्याच्या गप्पातून जाणवे.मी गावात गेल्यावर कधी कधी त्याची रस्त्यात गाठ पडायची मग हटकून तो घरी घेऊन जायचा व चहा पाजायचा.मराठवाड्यातच त्याचे गाव होते तेथे बऱ्यापैकी शेती होती.कधी तेथे लावलेला ऊस तर कधी कपास याविषयी सांगायचा.त्याचे लग्न बहुतेक तो शिकत असतानाच झाले होते.पण त्याच्या घरी गेलो असता त्याची बायको मात्र पहायचा योग आला नाही. मराठवाड्यात अजूनही काही कुटुंबात बायका घरात असल्या तरी पुरुषांसमोर येण्याचा संकोच करत.मुस्लिम अंमलाखाली अनेक वर्षे काढल्यामुळे त्यावेळी औरंगाबादमधील काही चित्रपटगृहातसुद्धा  मागील बाजूस पडदा लावून त्यामागे स्त्रियांची बसण्याची सोय केलेली असे. चित्रपट चालू झाल्यावर पडदा बाजूस सरकवण्यात येई.

             बंगाळेने माझी बऱ्यापैकी दोस्ती संपादन केली .पण एकदा मात्र त्याने मला जरा पेचात टाकले.पगाराचा दिवस होता.त्यावेळी राजपत्रित अधिकाऱ्यांचा पगार चेकने मिळे.चेक आल्याची वर्दी एकादा शिपाई आणी व मग आम्ही चेक आणायला जात असू.तसे आम्ही चेक घेऊन आल्यावर बंगाळेने मला गाठले

"  एस. जी. एक काम आहे.प्लीज नाही म्हणू नकोस." आमच्याच काय सगळ्याच विभागात कुलकर्णी बहुसंख्य असल्यामुळे  आमच्या आद्याक्षरातच आम्हाला संबोधले जाई.

" बोल करण्यासारखे असेल तर करीन." मी म्हणालो.

" यावेळी   बियाणासाठी कर्ज अजून मिळाले नाही पुढच्या महिन्याच्या एक तारखेस निश्चित मिळेल तोपर्यंत तुझ्या पगाराचा चेक जर मला देशील तर मोठे काम होईल. कारण बियाणाची खरेदी आत्ताच करायला हवी."

         पगाराचा चेक म्हटल्यावर माझी छातीच दडपून गेली.त्यावेळी आमचे पोट अगदी हातावर नसले तरी  पूर्णपणे महिना अखेरीस येणाऱ्या पगारावरच अवलंबून होते आणि माझ्यावर अवलंबून बरीच माणसे घरात होती.ही गोष्ट बंगाळेला माहीत होती पण त्याचबरोबर माझी बहीण नोकरी करते हेही त्याला माहीत होते त्यामुळे एक महिना तिच्या पगारावर आम्ही काढावा व माझा पगार त्याला द्यावा असा त्याचा विचार होता.

            कोणालाही नाही म्हणणे माझ्या जिवावर येते हे त्याला पक्के माहीत होते पण  त्याच बरोबर का कुणास ठाउक हा म्हटल्याप्रमाणे पुढच्या महिन्यात पैसे परत करणार नाही असेच मला वाटत होते.त्यामुळे त्याने कितीही म्हटले तरी त्याला चेक द्यायचा नाही असे मी पक्के ठरवले होते पण तरीही त्याने असा काही पाठपुरावा केला की शेवटी मी त्याला बळी पडलो.  इतर बाबतीत माझे अंदाज बहुधा  हमखास चुकतात पण पैसे परत मिळण्याविषयीचा हा अंदाज मात्र अगदी तंतोतंत बरोबर निघाला,

       पहिली गोष्ट म्हणजे एक तारखेला बाबुराव कॉलेजला आलाच नाही.आणि नंतर आल्याचे मला दिसताक्षणीच तो जो गायब व्हायचा तो परत कधी दिसायचाच नाही.माझ्या शेजारी बसण्याची जागा त्याने बदलली होती शिवाय आम्हाला वेगवेगळ्या तासाला जावे लागत असल्याने ठराविक ठिकाणी आम्ही कोणीच रहात नसू.त्यामुळे त्याला पकडायचे म्हणजे शिकवण्याचे काम सोडून त्याच्यावर पाळतच ठेवायला लागली असती आणि ते मला जमण्यासारखे नव्हते.शेवटी त्याच्या घरीच त्याला पकडायचे असे ठरवून एक दिवस शोध घेत त्याच्या घरीच गेलो.  आजच्यासारखे त्यावेळी फोन करून जायला कोणाकडेच फोन नव्हता आणि असताच तर त्याने फोनवरच असे काहीतरी कारण सांगितले असते की मग त्याच्या घरी जाण्यात काही अर्थच नाही असे मला वाटले असते किंवा मी येणार म्हटल्यावर त्याने घरातून पळ काढला असता.

      बाबूरावच्या घरी त्यावेळी कोणीच नव्हते. शेजारच्या घरात चौकशी केल्यावर बाबुराव गावी गेला आहे असे कळले अर्थात माझ्या चेकसाठी त्याच्या गावाची वाट धरणे मला शक्यच नव्हते.मुकाट्याने परत घरी आलो व पुन्हा आमचे नित्य दिनक्रम चालू राहिले.सात आठ दिवस असेच गेले आणि एक दिवस बाबूराव कॉलेजात दिसला पण त्याचा नूर जरा उतरल्यासारखा दिसला.या वेळी मात्र त्याला पकडण्यात मला यश मिळाले.  मी तावातावाने गेलो होतो  आणि जरा गुश्शातच मी त्याला विचारले

" वा बाबुराव चांगलाच हिसका दाखवलास मला  तू !असा कुठ गायब झाला होतास ?"

पण त्याचे उत्तर ऐकल्यावर  मात्र माझ्या अशा बोलण्याचा मला पश्चाताप झाला.

" अरे काय सांगू बायको गेली माझी?" त्याची बायको त्याला सोडून पळून गेली असा माझा समज झाला अस का वाटल काही कळत नाही कारण त्याची बायको त्यालाच पळवून लावेल असे वाटण्याइतका त्याचा एकूण स्वभाव मवाळ होता. अर्थात  तोपर्यंत माझे लग्नही झाले नसल्यामुळे बायको पळून का जाऊ शकते आणि तशी ती गेल्यावर काय करावे लागते याची मला कल्पना असणे शक्य नव्हते.तरीही

" मग तिचा शोध घेतलास की नाही?" असे विचारण्याचा मूर्खपणा मी केला

" गेली म्हणजे कायमची " वर बोट दाखवत तो म्हणाला तेव्हां कोठे त्या बातमीतला गंभीरपणा माझ्या लक्षात आला.

"असे कसे झाले? आजारी वगैरे होती का?’ मला अधिक चौकशी करणे भाग पडले.

" छे छे आजारी बिजारी काही नव्हती , बुडून गेली."तितक्याच शांतपणे बाबूरावने उत्तर दिले.

"बुडून?"त्या काळात प्रकृतिस्वास्थ्यासाठी जिम, पोहणे वगैरे उपक्रम भगिनीवर्गात प्रिय नव्हते.

" हो,पाणी भरायला नदीवर गेली होती पाय घसरून पडली आणि --- " बाबुरावने वाक्य अर्धेच सोडले. अर्थात अशा सुरवातीनंतर मला माझ्या पैशांचा विषय काढणे म्हणजे त्याच्या दु:खावर डागण्या देण्यासारखे वाटले आणि मी गप्प बसणे पसंत केले.

"आमच्या गावात साली हीच अडचण आहे पाण्यासाठी नदीवरच जाव लागत.नळ वगैरे काही नाही." पुन्हा त्यानच बोलण चालू ठेवल आणि त्यामुळे आपल्याला फार गंभीर व्हायची आवश्यकता नाही असे मला वाटू लागले.

     मग त्याने सिगारेटच पाकीट काढून एक सिगरेट शिलगावली.तोपर्यंत सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान न करण्याची सूचना शासनाने जनहितार्थ जारी केलेली नव्हती.

" पण तू काळजी नकोस करू " बाबुरावने एक झुरका ओढीत संवाद जारी ठेवत म्हटले.

"तुझे पैसे पुढच्या महिन्यात नक्की परत करतो."

येवढ्या दु:खातही माझे पैसे परत करण्याचे त्याला आठवत होते हे पाहून मला अगदी भरून आले.तेवढ्यात तास संपल्याची घंटा झाली आणि मला तासावर जायचे होते हे आठवले.

"ठीक आहे काळजी घे मी तासावर जातो " मी उठत म्हणालो.

क्रमशः