ही हुंदकतेय्...

ही हुंदकतेय् ही फुंदकतेय् बगा की वो जरा...
इची समजूत कुनी तरी काडा ॥धृ॥

इची सासू लई खट्याळ
तिचं बोलनं भारी वंगाळ
तिच्या डोळ्यात सदाचा जाळ
बरी म्हनावी एकादी हडळ...
इला सहन होत नाय् इला सांगता येत नाय्...

 असंय होय्?... व्हय् नाऽऽऽ

ही हुंदकतेय् ही फुंदकतेय् बगा की वो जरा...
इची समजूत कुनी तरी काडा ॥१॥

इचा सासरा लई कुचाळ
जमवितो टाळकी कुटाळ
त्येच्या डोस्क्यात चहाचं खूळ
नाय् उसंत मिळू देत् पळ
इला सहन होत नाय् इला सांगता येत नाय्...

 असंय् होय?... व्हय् नाऽऽऽ

ही हुंदकतेय् ही फुंदकतेय् बगा की वो जरा...
इची समजूत कुनी तरी काडा ॥२॥

इचा नोवरा श्रावण बाळ
त्येला भायेर् हत्तीचं बळ
पन त्यो घरात मुखदुर्बळ
त्येच्या खांद्यावर दुसऱ्याची बाळं
इला सहन होत नाय् इला सांगता येत नाय्...

 बरोबरंय्... मग एकांतात सांगायचं की नवऱ्याला...

इच्यासाठी नोवऱ्याला नाय् वो येळ...

 काय खरं नाही मग इचं...

इला सहन होत नाय् इला सांगता येत नाय्...
ही हुंदकतेय् ही फुंदकतेय्  बगा की वो जरा...
इची समजूत कुनी तरी काडा ॥३॥