माझा 'शोध मनाचा' (पुस्तक का छापावं?)

माझा 'शोध मनाचा' (पुस्तक का छापावं?)

माझा हा लेख 'पुस्तक का छापावं?' या विषयावर आहे, आणि त्यातूनही मराठी
पुस्तक का छापावं यावर आहे. सुरूवातीलाच स्पष्ट करतो की मराठी पुस्तकं
लिहून कोणी श्रीमंत झाल्याचं मी तरी ऐकलं नाहीये. पोटापुरते पैसे मिळतात
पण अती धनलाभ होत असेल असं नाही. त्याची कारणे अनेक आहेत आणि ती चुकीची
आहेत का बरोबर हा स्वतंत्र विषय आहे. पण थोडक्यात म्हणजे 'पुस्तक का
छापावं?' याचं उत्तर 'श्रीमंत होण्यासाठी' हे असू शकत नाही.

मग ते उत्तर नसेल तर दुसरं सहाजीक उत्तर म्हणजे 'लोकप्रिय' होण्यासाठी. पण
यात पण एक गडबड आहे. आजकालच्या धावपळीच्या जीवनात एकंदरीतच पुस्तकं
वाचणारे कमी झाले आहेत आणि त्यातून मराठी वाचक तर अजूनच कमी झाले आहेत.
ज्या काळात क्रिकेट सारखा लोकप्रिय विषय लोकांनी ५० पासून फक्त २०
शटकांपर्यंत आणलाय त्या काळात पूर्ण पुस्तक वाचायला वेळ आणि उत्साह फार
कमी लोकांकडे असतो. आणि पुस्तक प्रकाशीत करून लोकप्रिय व्हायला भरपुर
महिने किंवा वर्ष पण लागू शकतात. म्हणून लोकप्रिय होण्याचे इतर आणि पुस्तक
छापण्यापेक्षा सोपे पर्याय आहेत.

तर मग ही कारणं नसतील तर पुस्तक का छापावं? मला पण हा प्रश्न साधारण एक
वर्षाआधी पडलेला. आणि डिसेंबर २०१० मधे मी माझा पहिला काव्यसंग्रह 'शोध
मनाचा' प्रकाशीत केला. माझी गोष्ट ऐका आणि मग पुस्तक का छापावं याचं उत्तर
मिळतय का बघा. मी गेली ६-७ वर्षे कविता करत आलो आहे. कविता मनातले विचार
व्यक्त करण्यासाठी केली जाते आणि मग विचार कुणीतरी ऐकावे ही अपेक्षा
निर्माण होते. कविता सगळ्यांना आवडतातच असं नाही, पण तरी काही मित्रांना
मी माझ्या कविता पाठवू लागलो. काही दिवसांनी ऑरकुटवर कविता टाकू लागलो.
इतर कविंशी गप्पा मारू लागलो. हुशार आणि अनुभवी अशा मित्रांबरोबर संवाद
करत असल्याने बरंच काही शिकू लागलो. नवे रंग कवितेत उतरू लागले आणि मी कवि
म्हणून ओळखला जाऊ लागलो. अजूनही कोणी मला कवि म्हटलं की मला 'मी कवि नाही'
असं सांगावसं वाटतं. मी एक साधा मुलगा आहे, ज्याला मनातलं व्यक्त करायला
कागद आणि लेखणीची मदत होते.

पण कविता सुरूच राहिल्या आणि वाचणारे हळूहळू वाढत होते. लोकांना माझ्या
कविता आवडतात का आणि आवडतात तर का आवडतात हे मला न सुटलेलं कोडं आहे. तरी
बरेच लोक कविता वाचत होते. मी काहींना भेटलोही, मस्त गप्पा झाल्या, नवे
मित्र झाले. मग ई-साहित्य या ऑरकुट वरच्या मित्रांच्या समुहाने माझ्या
कवितांचं ई-बूक तयार करून ते लोकांना ई-मेल केलं. नक्की किती लोकांपर्यंत
ते पोचलं ते मला माहित नाही पण बरीच उत्तरं ई-मेल व्दारे आली. स्वत:च्याच
कवितेवरचा विश्वास वाढू लागला. लोकांनी आपल्या कविता वाचल्या आणि त्यांना
कविता आवडल्या याचा आनंद दुप्पट, तिप्पटच नाही तर कितीतरी पट वाढू लागला.
मी कविता करतो हे माहित नसलेल्या काही नातेवाईकांना जेव्हा ते ई-बूक
त्यांच्या मित्रांकडून मिळालं तेव्हा घरी चौकशी सुरू झाली. काही कविता
वाचल्यानंतर 'अगदी आमच्या मनातलं लिहितोस' असंही काही लोक म्हणू लागले.
मित्रांची संख्या रोजच वाढत होती. काहींनी पुस्तक प्रकाशित करतोस का असा
प्रश्न केला आणि वेगळेच प्रश्न डोळ्यासमोर दिसू लागले. स्वत:साठी कविता
करणारा एकटा मी या प्रश्नांना घाबरू लागलो, उत्तरं शोधू लागलो.

पुस्तक काढायचं कशाला? आपल्या कवितांवर कोणी हसणार तर नाही ना? टीका
केल्या तर त्या आपल्याला सहन होतील का? आपलं मराठी चांगलं नाहीये, त्याची
चर्चा झाली तर? लोकांना कविता आवडल्या नाहीत आणि म्हणून मला कविता लिहिताच
आल्या नाहीत तर? कविता म्हणजे मनातलं व्यक्त केलेलं, ते आपल्याला इतक्या
लोकांना दाखवायचं आहे क? हे मला पडलेले काही प्रश्न. प्रश्न वाढतच होते
आणि उत्तरं सापडत नव्हती. मग विचार केला उत्तरं नंतर शोधू आधी प्रकाशक
मिळतोय का बघू. साधारण १०० कविता ७-८ प्रकाशकांना पाठवल्या आणि काही
अपेक्षा न ठेवता देवा पाशी प्रार्थना सुरू झाली. साधारण एका आठवड्यातच
बऱ्याच प्रकाशकांकडून नकार आला. जास्त आपेक्षा नव्हत्या म्हणून दु:ख पण
कमी झालं. मग मुक्ता पब्लिशिंग हाऊस कडून होकार आला. आनंद तर झालाच, पण
क्षणात वर पडलेले प्रश्न परत आले.

मग मी कविता वाचणाऱ्या मित्रांची मदत घेतली. "खरंच कविता चांगल्या आहेत
का? छापण्यासारख्या आहेत का?" असे कितीतरी लोकांना विचारले. सगळेच म्हणाले
पुस्तक काढण्यासारख्या आहेत कविता. मी पण, प्रकाशकाने कविता निवडल्या आहेत
म्हणजे खरंच काहीतरी चांगलं असेल कवितेत, या विश्वासाने पुस्तकाचे काम
सुरू केले. साधारण ५-६ महिन्यांनंतर डिसेंबर २०१० मधे पुस्तक प्रकाशनाचा
सोहोळा झाला. इंटरनेटवर कविता वाचणारे बरेच मित्र सोहोळ्याला हजर होते.
हॉल पूर्णपणे भरलेला आणि काही लोकं पाठी उभे पण होते. कित्येक जणांनी
यायला जमलं नाही म्हणून फोन केला. पुस्तकाचे लोकांनी भरपूर प्रेमाने,
आपुलकीने आणि टाळ्यांनी स्वागत केले. मी न बघितलेले, जास्त ओळखही नसलेले
हे मित्र मी त्यांचा भाऊ किंवा नातेवाईक किंवा एखादा मोठा कवि असल्यासारखे
हजर होते. सोहोळ्यानंतर कित्येकांशी मी पहिल्यांदा भेटत होतो पण माझ्या
कवितांमुळे आमच्यात एक नातं आधीच तयार झालेलं.

सोहोळा संपला आणि पुढच्या दिवशी सकाळ मधे बातमी पण आली. लोकमत या
वर्तमानपत्राला माझी मुलाखत पाहिजे असे सांगायला, प्रकाशकाचा फोनही आला.
या सगळ्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. नंतर जेव्हा लोकमतच्या सुहास यादव
यांच्याशी गप्पा झाल्या तेव्हा ते ही म्हणाले "मी सहसा कविता वाचत नाही पण
तुझं भाषण ऐकून वाटलं याच्या कविता वाचाव्या." मी परत आश्चर्यचकीत झालो.
माझ्याहून वयाने आणि अनुभवाने कितीतरी मोठे लोक माझ्या कविता वाचत होते
आणि माझं कौतुक करत होते. त्यांचा आनंद आणि प्रेम मला त्यांच्या डोळ्यात
दिसत होतं. काही वर्षांपासून स्वत:साठी कविता करणारा मी, आज अचानक सुमारे
२००-३०० लोकांपर्यंत माझे शब्द पोचवत होतो. मी खरंच जादूच्या जगात होतो,
जिथे काहीही अशक्य नव्हतं. पुस्तक होईल असं मी आणि काही खास मित्रांनी
बघितलेलं स्वप्न खरं तर झालंच होतं पण कित्येक लोकांनी ते आवडीने
स्विकारलंही होतं.

मित्रांनी त्यांच्या मित्रांना माझं पुस्तक दिलं होतं, कविता वाचून
दाखवल्या होत्या. मग शिरीष काका, ज्यांना कविता ई-मेल ने मिळत होत्या,
'कविता वाचनाचा कार्यक्रम ठरवुया का?' असं विचारलं. इतक्या मोठ्या
लोकांसमोर स्वत:च्या साध्या-सोप्या कविता वाचायच्या म्हणजे परत मला भिती
वाटू लागली. कविता आवडतील का? लोकांना कविता ऐकून झोप तर येणार नाही ना?
इतक्या मोठ्या माणसांसमोर आपण काही चुकीचं तर नाही करणार ना? असे प्रश्न
सुरू झाले. पण तरी कविता वाचनाचा कार्यक्रम झाला आणि सफल झाला असं म्हणावं
लगेल कारण लोकं शेवटपर्यंत जागी होती. कविता वाचताना चुका झाल्या
माझ्याकडून पण त्या सगळ्यांनी समजून घेतल्या आणि त्या संध्याकाळी
सगळ्यांनाच मजा आली. मला या सगळ्या लोकांचे आभार कसे मानावे हेव कळत नाही.
आपले शब्द लोकं वाचतात आणि त्यांना ते पटतात आणि आवडतात यात एक वेगळाच
आनंद आहे. त्या नंतर अजून एक कविता वाचनाचा कर्यक्रम झाला. परत माझ्या
चुका झाल्या नाहीत असं नाही पण माझे प्रेक्षक फार चांगले आणि रसिक होते.

पण मी 'पुस्तक का छापावं?' याचं उत्तर अजून दिलं नाहीये. आणि मजा म्हणजे
ते मला माझ्या पुस्तकाच्या नावातच मिळालं. मी, माझ्या कविता म्हणजे माझ्या
मनाचा शोध आहे, यामुळे पुस्तकाचं नाव 'शोध मनाचा' ठेवलं होतं. खरंतर हे
नाव पण शिरीन यांनी सुचवलं होतं. पण हे पुस्तक म्हणजे फक्त माझ्या मनाचा
शोध नव्हतं. हे माझ्यासारख्या कविताप्रेमींचा शोध होतं. रंजना सरदेसाई
यांनी हे पुस्तक प्रुफ-रिड केलं होतं, शिरीन यांनी नाव सुचवलं होतं आणि
अजून कितीतरी मदत केली होती. रेणू साळवींनी तर आग्रह करून पूर्ण परिवाराला
मुंबई ते पुणे प्रकाशन सोहोळ्यासाठी आणलं होतं. शिरीष काकांनी मला कविता
वाचनाची संधी दिली होती त्याच्यासाठी लागणारं प्रोत्साहन दिलं होतं. रेखा
काकू, म्हणजे शिरीष काकांच्या पत्नी, यांनी कविता वाचताना मला खोकला झाला
होता म्हणून गरम पाणी करून दिलं होतं. सगळ्याच कविता ऐकणाऱ्यांनी आणि
वाचणाऱ्यांनी मला पाहिजे असलेला आत्मविश्वास दिला होता, माझं भरपुर कौतुक
करून मला निखळ आनंद दिला होता. तसं बघितलं तर हे लोक माझे कुणीही नव्हते
पण यांनी मला न मागता खुप प्रेम आणि आधार दिला. माझं पुस्तक म्हणजे या
नव्या मित्र परिवाराचा शोध, माझ्यासारख्या विचार करणाऱ्यांच्या मनाचा शोध
होता आणि अजूनही आहे. हेच माझं 'पुस्तक का छापावं?' याचं उत्तर आहे.
प्रकाशन सोहोळ्यानंतर कुणीतरी येऊन मला एवढच सांगितलं होतं, तू छान
लिहितोस, पण तुझ्यातला innocence घालवू नकोस." तुम्ही innocently आणि
प्रामाणिकपणे जे लिहिलय ते वाचायला जग तुमच्या पुस्तकाची वाट बघतय. तुमचा
संदेश तुम्हीच लोकांपर्यंत पोचवू शकता.

-- मयुरेश कुलकर्णी