पावले टाकीत गेले की रस्ता उलगडत जातो
संपला संपला असे वाटले तरी तो पसरत जातो
अंतहीन क्षितिजापार वाटतो
त्याचे टोक गाठू ,तर निव्वळ अशक्य असते
सिंदबाद्च्या सफरीपेक्षा ते अवघड वाटते [!]
रस्त्याची आभूषणे म्हणजे डेरेदार झाडे
वडाची झाडे किती गच्च दाट असतात
पाखरांचे वसतीस्थान नि छान सावली देतात
झाडामुळे रस्ते शोभिवंत दिसतात
गच्च झाडीतून गेलेला रस्तां किती आपला वाटतो
रस्त्याला पाउलवाटा भेटतात नागमोडी वळणाच्या
भेटतात नि मिसळून जातात
हरवून जातात त्यांचे नागमोडीपण
विसरून जातात आपलेपण
आपल्या हिरवळी सकट ...!!
कधी मध्येच रस्ता गावात शिरतो
रस्त्याच्या कडेला मैदान असते
कोठेतरी घरांची गिचमिड ...
कौलारू घरे नि काही धाब्याची घरे …
गोजिरवाणी ठेंगणी ठुसकी काही अगडबंब देखील असतात
तेव्हा रस्ता केविलवाणा वाटतो
मठ्ठ मुलासारखा गांगरून जातो
तो जेव्हा गावाच्या तावडीतून सुटतो
मग शाळा सुटल्या मुलासारखा मस्त असतो
पण
कधी कधी रस्ता एकांतात मग्न असतो
सन्यासा सारखा अलिप्त वाटतो
झाडीझुडीत हरवून जातो
घट्ट सावलीत गोजिरवाणा दिसतो
पावले ढकलीत राहिलात की रस्तां उलगडत जातो
रस्ता डोंगराला लगटून जातो
तेव्हा त्याला बघावा
नागमोडी वळणाचा बघावा
सळसळनार्या सापासारखा बघावा
झाडांनी गच्च बघावा
काळ्या कभिन्न ढगांनी ओथंबलेला बघावा
काळा मिट्ट ढग रस्त्यावर ठिय्या देऊन बसलेला बघावा ...
तरी रस्त्यापासून सावध राहावे
रस्ता कधीच आपला नसतो
त्याच्या हातात यमाची काठी असते
चुकला तर प्राणाशी गाठ असते
मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक
एवढेच फक्त लक्षात ठेवा
मग रस्ता आपला असतो
जिवाभावाचा सखा असतो ...!!