वळिव
कोंदाटल्या दाही दिशा वारा श्वास कोंडलेला
आसमंत जणू सारा मंत्रभूल घातलेला
उठे वाऱ्याची लहर फोफावते वेडीपिशी
घुसळून काढी सारे वॄक्ष रान कासाविशी
मेघ गर्जना करोनी विजेलाही कापविती
युद्धभूमिवरी जसे कोणी थैमान घालिती
थेंब टपोरे टपोरे भुईवरी धावले हे
मृग नक्षत्र नभींचे धरेवरी ओघळले
गंध मातीचा हा खरा उराउरात साठला
आवेग हा मिठीतला नि:श्वासात प्रगटला