केनोपनिषद छंद- साकी

मन हे धावे जिकडे तिकडे विविध विषय सेवाया /

स्फूर्ती तयाला कोण देतसे कोणाची ही माया? //१//

इंद्रियगण हा देहीं भरला प्राण तयांचा राजा; /

कोणाची तो आज्ञा मानुनी जाई आपुल्या काजा? //२//

जिव्हा तैसे ओठ हालती बोले वाचा/

शब्दामागुनी शब्द निपजती चालक कोण तयांचा? //३//

शब्दांचा रव येतां श्रवणीं होई तदर्थबोध; /

कोण तयांतें शिकवी याचा झाला कवणा शोध? //४//

सर्व इंद्रियांपुढें असोनी जगतीं पदर्थ मात्र /

नयन त्यांमधीं पाहवयाला केले कवणें पात्र? //५//

श्रवणिं राहुनी श्रवण करी तो आहे त्याहुनी अन्य /

ज्ञान तयाचें जया जाहलें तोच जगीं याधन्य! //६//

करोनी आश्रय ज्याचा मन हें विषयीं रमोनी राहे/

धन्य धन्य तो जगीं जाहला जो कीं तयास पाहे //७//

वाचा बोलो शब्द परी जो वाचेचीही वाचा; /

धन्य धन्य तो जगतीं ज्याला झाला बोध तयाचा //८//

प्राण असे हा प्राण इंद्रियां , प्राण परी प्राणाचा, /

जया तयाचा बोध जाहला धन्य जगीं तो साचा! //९//

नेत्रांतें या जयावांचुनी बल नच अवलोकाया, /

तया जाणतां मोक्ष पावती नश्वर त्यजितां काया. //१०//

कवणाचेही नेत्र तयातें पाहवया नच शकले/

सर्व गामी मन निशिदिनिं त्यातें शोध शोधितां थकलें //११//

वाणी बोले ज्ञान तयाचें होतां मीं त्या वानीं /

निराश सर्वही झालीं कळतां कुंठित होई वाणी ! //१२//

इंद्रियांमधीं स्वयें राहुनी बल तो ओपी तयांते; /

तींच तया मग कशीं पाहतीं जगताच्या पितयातें? //१३//

ज्ञात असो वा अज्ञात तसें जगतीं जें जें कांहीं/

विषय जाहला नसे आजवरी तो तों कवणाचाही //१४//

ब्रह्म म्हणती त्या परी तयाचें कवणा न रुप ठावें /

स्वतां न कळतां सांगो जातां अन्या केविं पटावें? //१५//

तपें तपोनी अमित काल वनिं अपुल्या पुर्व्जनांहीं /

अनुभव घेउनी लक्षण त्याचें अनुमानियलें कांहिं //१६//

ब्रह्म समजुनी उपासिती परी जडले त्यांस उपाधी /

नव्हे नव्हे तें ब्रह्म म्हणोनी हेंच सांगतों आधीं //१७//

वाचा त्यातें व्यक्त न करिते तेंच प्रकटवी वाचा /

मनही न कळे परी व्यापिला तेणें देश मनाचा //१८//

पाहों येना नेत्रांतें परी नेत्रांचे व्यापार /

अलिप्त भावें चालवीतसे राहुनी सर्वा पार //१९//

श्रवणांतें तें श्रुत न जाहलें तेची तया श्रुत झाले /

प्राणांवरी तें नसे विसंबुनि प्राणचि तेणें चाले //२०//

म्हणसी बाळा ! "जरी तें कळलें सारें हृदयामाजी /

तूतें परिसुनी चित्तवृत्ति परी शंकित होई माझी//२१//

"देवतात्म तें रुप तयाचें " म्हणसी "जरी मज ठावें " /

नोहे संशय निरस्त माझा कथितों तुजला भावें. //२२//

" नाहीं नाहीं ज्ञान जाहलें आतां म्हणसि कसा रे ? /

ज्ञान न झालें हें कळलें तरी ज्ञान हेंच गा सारें " //२३//

"ज्ञान जाहलें ब्रम्हाचें त्या " म्हणती जे कीं लोकीं /

अज्ञानी ते पुर्ण म्हणावे तत्त्व हेंच अवलोकीं //२४//

" न कळे न कळे " म्हणुनि राहिले जे कीं मुग्ध जनांत /

स्फूर्ती तयाचि खरी होतसे त्यांच्या जाण मनांत //२५//

जो जो घ्यावा अनुभव तो तो तेणें व्यापियला हो /

खुण कळे ही जरी जाहला ज्ञानाचा त्या लाहो //२६//

ज्ञान उद्भर्वे अज्ञान  लया जातां आपोआप /

बल ये तेणें पुनरपि नुपजे अज्ञानाचें पाप //२७//

जाणे त्यातें जों न जाहला देहाचा या पात /

सत्य जन्म तरि ना तरि तेणे केला अपुला घात//२८//