सावळी चैतन्यकळा-१

थेंबातून अवतरे
मेघचैतन्य सावळा
आसमंत धुंद सारे
भोगी आनंद सोहळा

थेंबाथेंबांची ही साद
पाखराच्या कंठी येई
सावळ्याच्या बासरीची
मुक्त तान रानी जाई

थेंब थेंब येता रानी
रत्न मोती लकाकती
झळाळून दावीतसे
सावळ्याची अंगकांती

थेंब थेंब टिपताना
राधा बावरून जाई
सावळा की भास मना
मनी मोहरून येई

थेंब कान्हा थेंब राधा
रास सर्वत्र रंगला
हरवले सृष्टीभान
सावळा की सृष्टीकळा