विरागी..
पावसाचे एक कधीच कळत नाही
मैत्र जुळुनही अनोळखपण संपत नाही
सौम्य -रौद्र स्वरूपातून अरूपाची ओळख देत नाही
सरसर दरदर कोसळूनही मौन काही सोडत नाही
सप्तरंगी खेळ कधी नजर उचलून पहात नाही
हिरवे लेणे लेववून धरा कवेत घेत नाही
अंगाखांद्यावर हात ठेवतो सखा कधी होत नाही
स्पर्शून जातो मनामनाला आठव कधी ठेवत नाही
विसंवादी सूर याचे ताल मेळ जमत नाही
मल्हाराशी याचे नाते तोडूनही तुटत नाही
भरभरून आला तरी शोष काही संपत नाही
दंवावाटे कधी उतरून नातं कधी तोडत नाही
मनातून पुसायचा म्हटला तरी जात नाही
आंसूवाटे कधी ओघळेल सुख-दु:ख याला नाही