ही तव रूपाची रम्यता सदैव मज जाणवू दे
चंद्रा तव चिर तारुण्य माझ्याही अनुभूतीस दे
मृदुल तरल काव्यभाव मजही राहावे स्पर्शत
हळव्या उत्कट सूरांसह मनही जावे लहरत
नयन थकले तरीही माझी नजर ताजी राहू दे
चंद्रा तव चिर तारुण्य माझ्याही अनुभूतीस दे
अनावर सागर लाटा, सुसाट बेभान वारा
कधीही ना शिणवो मजला सृष्टीचा आवेग सारा
अलगद जावो सुटोनी तनुची ही फोलपटे
चंद्रा तव चिर तारुण्य माझ्याही अनुभूतीस दे