मन

मन कधी पाखरू पाखरू
कधी गगनभेदी घार
कधी कुशीतले कांगारू
कधी लपलेली मांजर

कधी क्षितिजाला गवसणी
कधी हुरहुरती पायवाट
कधी शिळ जागेपणी
कधी रेंगाळलेली रात्र

कधी पावसाच्या जलधारा
कधी नशिबाचा पसारा
कधी चावट भावना
कधी मुक्त विचारणा

कधी भूतकाळाची खंत
कधी भविष्याची भ्रांत
वर्तमानाची मात्र वेगळीच बोंब
तरी असते ओठावरही हास्य


कधी रमते स्वप्नामध्ये
कधी वावरते सत्यामध्ये
प्रश्न असंख्य मग
मन मनालाच विचारते

कधी तळ्यात मळ्यात
कधी डोंगराच्या शिखरावर
कधी मिष्कील चंचल
कधी गूढ आणि निश्चल

नाही कळणार कोणाला
कोडे राहील असे सतत
तरी समजावयाचे असते त्याला रोज
साथ देते कारण तेच सतत