प्रवास

का ना मिळे कळेना आराम-घास अजुनी?
हा कोणत्या दिशेचा आहे प्रवास अजुनी?

हे शीड फाटले अन, तुटले जरी सुकाणू
क्षितिजा तरी तुला का, माझाच ध्यास अजुनी?

ज्योती फुकून टाकू, ही वल्गना कशाला?
वणवा उठेल गगनी, नियतीस आस अजुनी!

उद्दाम शुष्क पर्णे झाकोळती मला का?
उत्स्फूर्त वादळांचे जपलेत श्वास अजुनी!

ही पाउले खुणेची नेती मला कुठेशी
कुठल्या मुशाफिराचा रस्त्यास भास अजुनी?