मी अडखळलो धडपडलो ठायी ठायी
सांभाळ मुला रे सांगुन गेली आई
ती प्राणपणाने लढली घन तिमिरात
कष्टात गुंतली अथक राबली बाई
मायेत गुंफुनी ऊब; गाइली अंगाई
भेटलो कधी तिज अखेर; आठवत नाही
वाढता वाढता वय गढले संसारात
मन शिणले; अवचित वृद्ध पाहिली माई
हरवल्या सावल्या हरले ऋण ओघात
मी जडलो अंधारात जखडलो उणा पोरका आत
ठरवून न ठरवूनही न घडले कांही
निसटल्या क्षणांनो सांगा मज;
मी कसा होउ उतराई....