थोर विभूती कुठे न दिसल्या
भटकंतीने थकून गेलो
चार धाम मी यात्रा केली
धाम पाचवे विसरुन गेलो
मनोकमना साधी होती
भाग्य असावे जरा सुरक्षित
धाम पाचवे उच्चभ्रू अन्
धेंडांसाठी म्हणे आरक्षित
कल्प्नेतही जाता तेथे
मनोमनी मी बहरुन गेलो
चार धाम मी यात्रा केली
धाम पाचवे विसरुन गेलो
वेशीवरती जरी टांगली
गेली होती त्यांची अब्रू
खुशाल होते नवीन धामी
देव कृपेने सारे गब्रू
पदराखाली देव झाकतो
कणाकुणाला समजुन गेलो
चार धाम मी यात्रा केली
धाम पाचवे विसरुन गेलो
या धामाचा अगाध महिमा
फलप्राप्तीही अगम्य आहे
म्हणून चारी धामाचेही
महत्व आता नगण्य आहे
मी दळभद्री भीक मागण्या
झोळी माझी पसरुन गेलो
चार धाम मी यात्रा केली
धाम पाचवे विसरुन गेलो
तिहार क्षेत्री धाम पाचवे
सरकारच हो दैवत इथले
देव कृपेने पचून जाती
पापे, काळी दौलत येथे
अपने बसकी बात नही है
जरा उशीरा उमगुन गेलो
चार धाम मी यात्रा केली
धाम पाचवे विसरुन गेलो
निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३