मी श्वास श्वास माझे केले तुझ्या हवाली
मुर्दाड जीवनाला माझी दया न आली
का वस्त्रहरण चाले सामान्य माणसाचे
जे फेडतात त्यांना मिळतात रोज शाली
मी पुण्यवान किंवा पापी म्हणा हवे तर
करवून तोच घेतो माझ्यात हालचाली
कोणी नसे कुणाचे पण सोबती हजारो
मधुनीच घेत जातो माझीच मी खुशाली
ओठात नाम देवा जेव्हा फुलून आले
काट्या - कुट्यातुनी ही अपसूक वाट झाली
हा आरसा बिलोरी वाटे मला नकोसा
तू लाज लाजता मी बघतो मलाच गाली
हासून वेदनेचे पचवा जहर सुखाने
गाऊ नका कधीही रडक्या उदास चाली
मिसरा कसा असावा मिसरा कसा नसावा
साधीच ओळ व्हावी संवेदनेस वाली
.... मयुरेश साने... दि. २० -नोव्हेंबर -११