संस्कृती मगरूर, म्हणजे फार झाले
संत इथले क्रूर, म्हणजे फार झाले
कोणते परिमाण आहे या जगाचे?
गुंज कोहीनूर, म्हणजे फार झाले
जाहली पडझड घराची... ठीक आहे
स्वप्न चक्काचूर, म्हणजे फार झाले
फुंकल्यावरती उकिरडे गाढवे ही
उधळती चौखूर, म्हणजे फार झाले
कोरडा प्रत्येक ओहळ येथला पण
या नदीला पूर, म्हणजे फार झाले
भेटण्यासाठी तुला आलो इथे मी
तू तुझ्यातच चूर, म्हणजे फार झाले
बोललो गमतीत की "भेटू नको तू"
हे तुला मंजूर, म्हणजे फार झाले
पत्र पाहोनी तुझे आनंदलो पण
कोरडा मजकूर, म्हणजे फार झाले
लोक म्हणती, " मी भला नाही कुणीही"
हा तुझाही सूर, म्हणजे फार झाले
" रात्र आहे, धुंदलेली, अन् ’अगस्ती’ "
" तू अजूनी दूर, म्हणजे फार झाले "
--- अगस्ती
(संपादित : प्रशासक)