अंगण

अंगण

छान सुबकसे जर्जर अंगण
मऊ मुलायम कुठे न खडवण
ओलावा अलवार राखते
धूळ न उसळे कधीही तेथून

छुमछुमले पैंजण कधी येथे
कंकण हिरवे चमकत होते
चिउ-काउच्या गोष्टी ऐकून
पिले उडाली सोडून घरटे

गर्द सावली उन्हे तळपली
ऋतुमानाची चाके फिरली
वादळवर्षा सुसाटवारे
सुरकुत थोडी दिसू लागली

दिसू लागता सांजसावल्या
अंगण अंतरी कातर कातर
तुळशीवृंदावन सामोरी
मंद मंद ज्योतीची थरथर

एकाकी त्या कातरवेळी
उरे साथीला सखी आगळी
एकमात्रचि ती रांगोळी
कणाकणांची केवळ जाळी