न सांगताच तुला कसे सारे कळून आले
ओठात उमटले शब्द पण भाव पळून आले.
गर्दीत शापदांच्या चेहरा हरवला मी
मुखवटाच शृंगारून फुले माळून आले.
भेदून थर मातीचा अंकुर उपजला होता
श्रावणातली हिरवाई ग्रीष्मात जाळून आले.
तेजात तळपते, इंद्रधनूवर झुलते तरीही
क्षितीजावर दिसताच तू नभ झाकोळून आले.
आता होईल वर्षा, सरली दीर्घ प्रतीक्षा
आशेच्या त्या मेघांना वारे पिटाळून आले.