भेट

जागे होण्याआधी गोकुळ
शांत अजुन पानांची सळसळ
चंद्र केशरी अजुनी आभाळी
पहाटवारा वाहे अवखळ

अजुन जुईची बंद पाकळी
नसे अजुनही किलबिल जागी
खट्याळ वारा घाली फुंकर
होई हलके राधा जागी

दाट सावळ्या केसांना मग
हळुच सारुन मागे काना
अर्ध्या मिटल्या लोचनात त्या
पहिली आठवण होते कान्हा

अधीर्‍या ओल्या अंधारातुन
भारावून ती चाले वाट
तिलाच ऐकू येतो आणिक
यमुनेचा तो हिरवा काठ

दिसते तेथे बाहू पसरुन
तीच आकॄती ओळखीचा बांधा
घुमु लागता त्याचा पावा
राधा नुरते आता राधा