कवितेचं अंतर्मन

कवितेसाठीचा श्रोता
रोखून ठेवावा लागतो
जसा भीती वाटल्यावर श्वास

अहेतुक जमलेल्या गर्दीकडे
पाहून कविता वाचणं
कित्ती सोपं..  ऐकतातच बिचारे

अर्थाचे अनर्थ, अनर्थाचे अर्थ
तरीही लय धरण्याची धडपड
किती इमानदार, किती छानदार

बिच्चाऱ्या कवीचे तर
बारा वाजतात
मग तो घड्याळ बंद करतो
कधी न पाहण्यासाठी

कालक्रम, दिनक्रम
कालचक्र, ऋतुचक्र
उत्तरायण दक्षिणायन
त्याला नसते सोयरसुतक

होळी असो वा दिवाळी
त्याचा बारा महिने शिमगा
कोण पाहतो त्याचा नाच ?
कोण ऐकतो त्याचा नाद ?

तरीही तो वाचत राहतो
स्वतःच ऐकतो
क्या खूब ! म्हणतो
कौतुकानं हात फिरवतो

स्वतःच्या मुलीसारखं
गोंजारतो कवितेला
मोठी होऊन लग्नाळलेली  कविता
वराच्या शोधात

ज्याच्या त्याच्या गळ्यात
हात टाकून म्हणते
"वाचून पाहा माझं
अंग प्रत्यंग ...

कुणी च पाहात नाही
कुणीच वाचित नाही
मग ती खूष होऊन
स्वतःचं कौतुक करते

नारसिसस सारखं
तिचा शाप तिला आवडतो
सारखं पाहात राहणं स्वतःकडे
पुन्हा पुन्हा आणि पुन्हा पुन्हा