भिंती

आणि मग..
मग उभ्या राहतात भिंती माझ्या चहूबाजूंना.
क्षणार्धात.
अंग झडझडून झटक्यात उभ्या राहणाऱ्या श्वापदाप्रमाणे.
दबा धरूनच बसलेल्या असतात त्या, बहुतेक... चोहीकडून, कायम.

मी
गलितगात्र जमिनीवर पडलेला
मातीच्या स्पर्शात आधार शोधत
निरर्थक.

सरकू लागतात भिंती माझ्याकडे.
शांत, निश्चिंत भिंती; माहिती आहे त्यांना
त्यांचे निर्धारित कार्य,
आणि आहे खात्री
परिणामांच्या अटळतेची.

डगमगत्या पावलांवर उभा राहत,
माझे हात त्यांच्याकडे रोखत
मी करतो प्रयत्न
अटळ परिणामांविरुद्ध लढण्याचा

त्यांना नाहीच पर्वा
माझ्या थकव्याची
माझ्या घशातल्या आवंढ्याची
माझ्या डोळ्यांतल्या अश्रूंची
आणि
माझ्या सगळ्यात भरून आलेल्या भीतीची...

दाटून येत राहतात भिंती,
आणि आक्रमतो माझ्या बोटांवर
त्यांचा थंड खरखरीत स्पर्श
ती बोटे मागे वळून मोडण्याच्या
एक क्षण आधी...

आणि मग
मोडत जातात माझ्या
रोखलेल्या हातांची हाडे
भिंतींवर उधळतो रक्तामांसाच्या चिखलाचा नैवेद्य
आणि सर्वव्यापी वेदनेतून व्यापतात भिंती
माझ्या नजरेची क्षितिजे
माझी कवटी त्यांच्यामध्ये दाबली जाऊन
कडकन फुटण्याआधी

आणि मग थांबतात भिंती
जेव्हा निमते त्यांच्यातले अंतर
तेव्हा.

एका अजस्त्र विध्वंस घडतो
भिंतींच्या वज्रमिठीत.
आणि उरत नाही एकही पुरावा
त्यांच्या अघोरी कृत्याचा
आणि माझ्या अस्तित्वाच्या कचऱ्याचा...