असाच यावा दिस एखादा

असाच यावा दिस एखादा
उडून जावी जून काजळी
सुकलेल्याही खोडावरती
मऊ झुलावी चैत्र पालवी

क्षणात जावी घोर निराशा
स्वैर उडावे अनाम पक्षी
लख्ख मनाच्या आकाशावर
पंखांची उमटवीत नक्षी

नको काळजी, नकोच चिंता
उत्साहाचे झरे वाहु दे
रुक्ष कोरड्या माळावर ही
इवली नाजुक फुले डोलू दे

असाच मग तो दिन संपावा
नक्षत्रे मनी साठवताना
दूर कुठेसे कुणि छेडावे
सतारीतल्या मधुर सुरांना........