साथ.....

हात घेउनी हातात
वाट चाललो कितीक
स्मरे आजही सुगंध
मेंदी खुललेला हात

उन्हातानात फिरलो
चांदण्यातही फिरलो
हात असाच हातात
नाही कधी दुरावलो

थोडे गोड थोडे कटू
किती आठवावे क्षण
खांद्यावर पाठीवर
हात निवाराया व्रण

हात गुंफले हातात
मन गुंतले मनात
दोन पायी एकवाट
सूर- ताल एकसाथ

एकटाच हालताना
हाता जाणवे पोकळी
सखे पुन्हा कधी भेटी
पुन्हा कधी हातमिठी.......