मी बघत बसतोय माझ्या मुलाकडे ....!!..

तो माझे बोट धरून चालत असतो शाळेचा रस्ता 
माझ्या घराजवळच आहे त्याची शाळा 
रस्ता वळला की लगेच दिसू लागते त्याची शाळा 
जशी शाळा जवळ येते तशी त्याची पकड घट्ट होते माझ्या बोटांची 
थरथर जाणवते त्याच्या बोटांची माझ्या बोटांना 
मी पण माझ्या हाताची पकड घट्ट करतो 
त्याच्या चिमुकल्या पंजाची 
नि अलगद सोडून देतो त्याला त्या चिमुकल्या फुलपाखराच्या बागेत 
पाण्यात ढकलले की प्रथम जसे घाबरायला होते 
तसा तो बिचकून जातो 
मग कोणी मित्र भेटला की त्याचा हात धरून 
हलकेच मला टाटा करतो 
रात्री अगदी घट्ट बिलगून झोपतो 
मी बघत बसतो त्याच्याकडे 
त्याच्या पापण्याची कधीतरी दिसते फडफड 
नि त्याच्या बोटांची घट्ट पकड माझ्या बोटाना जाणवत असते 
कदाचित त्याला शाळेत जायची वाटत असावी भीती [?] 
आणि मी निर्दयपणे त्याला ढकलून देत असतो 
ह्या प्रचंड फुललेल्या फुल-बागेत 
स्वप्न बघत बसतो उद्याची ...
मला त्याला करायचे असते डाक्टर ,इंजिनियर ,नि अधिक काहीतरी 
नि नासवून टाकतो त्याचा वर्तमान काळ 
त्याच्या मनातील फुलबाग 
नि त्याला बनवीत असतो ह्या यंत्रयुगाचा  एक खिळा 
माझ्या निष्टुर लोखंडी हातांनी ....!!