महान कार्यात निमित्त बनावे
मग स्वतःला सामान्य का समजावे?
स्थानापन्न ऊंचावर व्हावे
कळस मंदिराचा व्हावे
पाणी म्हणजे जीवन
कलशात वरुण केला स्थापन
मनोभावे केले पुजन
जसे कमळ आणि सूर्य, तसे कलश आणि वरुण
कलश प्रतिक मानव देहाचे
जीवनरुपी जल आणि प्राणात्मक ज्योतीचे
कलश समुद्रमंथनातील एक रत्न
हे सांगणे उपनिषदांचे
विड्याच्या किंवा आंब्याच्या पानाने सजवावा
दोघांनीही समृद्धी व टवटवीतपणा दर्शवावा
मध्यात कलशाच्या मान श्रीफ़ळाचा
संबंध दोन प्रतीकांचा
कलशात पाणी, नारळात पाणी
जीवनाची हे सांगती कहाणी
कलशात अमृत, नारळात देववाणी
कलशात चराचर, सुरेल ती गाणी
ऋग्वेदात ऊल्लेख कलशाचा
सत्कार हा गर्भवती पृथ्वीचा
खालील भाग तो पृथ्वीतत्त्वाचा
विस्तृत तो मधला जीवनाचा, जलाचा
गळ्याचा भाग तो अग्नीचा
उघडा भाग वायुतत्त्वाचा
नारळ व पाने आंब्याची, निर्देश आकाशाचा
नारळाचे निमित्त सहस्र चक्राचे
कलश मुळ किंवा पायाचे
म्हणजेच नियंत्रण मुलाधार चक्राचे
कलशावर स्थापना नारळाची
मंदिरावर कळसाची
लांबून दिसते छबी ती उगवत्या कळीची
कळीसारखा तो कळस
वंदन करितो सूर्यास