नाबाद ७५

माझी पूर्वीचीच कविता थोडी बदल करून सादर करत आहे...

       

           नाबाद - ७५

          

परवा म्हणाले कोणीतरी, दाढीची खुंटे पिकली जरी

बायको पोरं नातवंड घरी, तरी पंतांवर फिदा पोरी ॥०१॥

         

कधीकधी असं दोस्त बरळती, वृद्धांच्या त्या कट्ट्यावरती

मूठभर मांस तेव्हा चढती, आमुच्या सापळ्यावरती ॥०२॥

           

पण!, आमुचा हा हर्ष राहतो, क्षणभराचा सांगाती

खवचट वाणी कोणाची, एवढ्यात तिथे पचकती ॥०३॥

            

म्हटले...!!

"जास्त चढू नये पंतांनी, हरभऱ्याच्या झाडावरती

असेल त्यांना 'सहानुभूती', ज्येष्ठ नागरिकांप्रती" ॥०४॥

               

अर्थात,

"त्यांचे हे बोल काही अगदीच खोटे नाहीत

आम्हासदेखील हे सारे तंतोतंत आहे माहीत"   ॥०५॥

        

नुकतेच आम्ही साजरे केले, अवघे पाऊणशे वयमान

केस डोक्याचे केव्हाच गेले, पिंड मात्र जवान ॥०६॥

     

दातांचीही पुरती पंगत, कधीची उठूनी गेली

कवळी बसवुनी आमुची होती, शष्ठब्द्यपूर्ती झाली ॥०७॥

          

नरडं आता साथ देईना, खोकल्याचीही उबळ जाईना

जरी पाहतो सुंदर ललना, गतकाळातील शीळ जमेना ॥०८॥

       

पुसट दिसे जरीही नयना, नित्य लाऊनी काळा चष्मा

चोरूनी पाहतो त्या युवतींना, मनी जागवूनी दाट उष्मा ॥०९॥

          

कानांचीही तीच गत, सगळं सारखंच ऐकू येतं

हिमेशचा तो 'सुऽऽऽरूर' आर्त, किंवा लतेची मधुर गीतं ॥१०॥

     

 पायही थकले, तोल गळाला, हाती धरले काठीला

अखेर!, पाच तपांच्या प्रतीक्षेनंतर, सवत लाभली पत्नीला ॥११॥
                     

हातांमधला त्राण गेला, कंप सूटू लागला

मेंदूचे निर्देष न आता, कूणी पाळू लागला ॥१२॥

          

मेंदूच्याही खूप आधी, मी हे सारे भोगले

जेव्हा हिच्याशी लग्न करून, घरी हीला आणले ॥१३॥

      

असो...!!

असे जगावे जीवन की, व्याधींवरही विजयी व्हावे,

दुःखांवरही हसूनी शेवटी हसता - हसता निरोप घ्यावे ॥१४॥

        

स्वतः नेहमी हसणं आणि हर्ष जगा देणं

हेच आजचं अस्तित्व अन उद्याची आठवण ॥१५॥