आली समज, मी जाणता झालो
भारावण्याला पारखा झालो
जग खेटरांनी पूजते इतके
पाषाण देवासारखा झालो
हुकुमी भिजाया लागले डोळे
इतका कसा मी कोरडा झालो?
आप्तेष्ट गृहकलहामुळे गेले
मी यादवोत्तर द्वारका झालो
विद्रूप होते चेहरे ज्यांचे
चिडलेत कारण आरसा झालो
शैशव म्हणे जपतात वृद्धत्वी
ऐकून मी वय चोरता झालो
तू सोडुनी गेलीस, अन् झटकन
मी फेसबुकवर "एकटा" झालो
जाळा अगर कबरीत मज कोंडा
मी पाय अलगद काढता झालो