एक मी अवतार होतो कुंभकर्णाचा!
अन् मला आजार झाला झोप नसण्याचा!!
रात्रभर झोपून सुद्धा झोप ना होते!
रात्रभर जागाच असतो शीण दिवसाचा!!
सारल्या बाजूस मोठ्या नोकऱ्या आम्ही.....
शिक्षकी पेशाच हा आधार जगण्याचा!
निवडणूकीचा सुरू हंगाम झाला की,
आव त्यांचा थेट असतो कार्यकर्त्याचा!
संपले तारुण्य, वार्धक्यातही आलो....
सांगते आयुष्य आता अर्थ प्रेमाचा!
प्रश्न तिन्हिसांजेस खेळू लागती झिंमा!
रोज ताळेबंद लिहितो मीच दिवसाचा!!
मीच डोळेझाक केली...हा गुन्हा माझा!
फायदा झाला जगाला अंध असण्याचा!!
फूल होणे हा कधी अपराध होतो का?
रोज मी करतो गुन्हा हा फूल होण्याचा!
आपल्यासाठीच झिजतो चहुकडे जो तो....
चंदनाचे खोड जाणे अर्थ झिजण्याचा!
वाटते आहे जगाला मी नवा आहे.....
बांधला मीही मनाशी चंग रुळण्याचा!
ऐन तारुण्यास होता शाप मृत्यूचा!
मनगटाने मिळवला उ:शाप जगण्याचा!!
पुण्यवंताचे कितीही सोंग घ्या तुम्ही;
एक दिवशी तो घडा भरतोच पापाचा!
मोल माझे काय आहे? काय मी सांगू?
सांगता येणार नाही भाव सोन्याचा!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१