कसली तृष्णा, ओढ कशाची मला लागली आहे? (खयाली तरही)

गझल (खयाली तरही)
कसली तृष्णा, ओढ कशाची मला लागली आहे?
आयुष्याची नदी कोरडी कुठे चालली आहे?

त्या पूर्वीच्या कुठे निरागस चेहऱ्यांस मी शोधू?
जो तो धारण करी मुखवटे! प्रथाच पडली आहे!

चार मुले खंदस्त त्यास पण, अमेरिकी झालेली.....
अखेर त्याची शेजाऱ्यांनी तिरडी धरली आहे!

हात तुझा मिळताच जाहली निम्मी सरशी माझी!
हा हा म्हणता, झुंज जिण्याची पूर्ण जिंकली आहे!!

दु:खांचे तम काय एकट्याने मी तुडवत होतो?
मी खांद्यावर तुझ्या, म्हणोनी वाट काटली आहे!
 
पळत्याच्या पाठीशी दृष्टी सतत धावली आहे!
जे होते हातात त्याकडे नजर न वळली आहे!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१