गझल
स्वप्ने दुमडली, मुडपले मनाला!
इतका कसा मी खटकलो जगाला?
हे, प्राण मी सोडताना, समजले....
वैषम्य वाटे कुणाला कुणाला!
दारावरी नाव अद्याप माझे!
भिंती न खिडक्या न छप्पर घराला!!
उलटे न कोणासही बोललो मी;
गेलो न बदलायलाही कुणाला!
आहे असा हा, तसा तो फलाणा....
न्याहाळ आधी स्वत:चे स्वत:ला!
चिंता किती चेहऱ्यावर शवाच्या .....
मेल्यावरीही न शांती जिवाला
इतकीच माझ्याच दु:खास चिंता....
लागू नये द्रुष्ट माझी सुखाला!
हल्ली असे ते भरवती प्रदर्शन....
करतात नुसते उभे नग नगाला!
काळे कशाला करू केस माझे?
बुरख्यात झाकू कशाला वयाला?
आला तुझा फक्त संदर्भ थोडा;
पडली किती आज कोरड घशाला!
वाचून हे शेर माझे कळावे.....
पडली घरे केवढी काळजाला!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे
फोन नंबर: ९८२२७८४९६१